आयपीएल उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूडचा तडका
रंगतदार सोहळ्याने उद्घाटन : दिशा पटानीचा भन्नाट डान्स तर श्रेया घोषालच्या आवाजाचा दरवळ
वृत्तसंस्था/ कोलकाता
इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामाच्या सामन्यापूर्वी झालेल्या उद्घाटन समारंभात स्टार्सनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. प्रसिद्ध रॅपर-गायक करण औजला, दिशा पटानी आणि श्रेया घोषाल यांनी त्यांच्या सादरीकरणाने धमाल केली. सामन्यापूर्वी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर एक भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता. उद्घाटन समारंभ संपताच, आयपीएलच्या 18 व्या हंगामाचा केक कापण्यात आला आणि आयपीएल 2025 चे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान, या हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अनेक सेलिब्रेटींची उपस्थिती होती.
आयपीएलच्या उद्घाटन समारंभात शाहरुख खानने आरसीबीचा खेळाडू विराट कोहलीसोबत ‘झूमे जो पठाण‘ या गाण्यावर भन्नाट डान्स केला. विराटने नृत्यात किंग खानला जोरदार टक्कर दिली. उद्घाटन सोहळ्या दरम्यान श्रेया घोषालने आपल्या जादुई आवाजाने उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली तर अभिनेत्री दिशा पटानीने भन्नाट डान्सचे सादरीकरण केले. पंजाबी गायक औजलानेही आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. याशिवाय, मैदानात लाईट शोही पहायला मिळाला. समारंभाच्या शेवटी शाहरुखनने बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांना स्टेजवर बोलावले. यावेळी आयपीएलमध्ये सातत्याने 18 सीझन खेळल्याबद्दल विराटला आयपीएल 18 चा मोमेंटो देण्यात आला. त्यानंतर आयपीएलला 18 वर्ष झाल्याने केक कापण्यात आला. तासभराच्या या सोहळ्यानंतर अधिकृतपणे आयपीएलच्या 18 व्या हंगामाला सुरुवात झाल्याचे घोषित करण्यात आले. आता, पुढील दोन महिने जगभरातील तमाम प्रेक्षकांना आयपीएलचा तडका पहायला मिळणार आहे.