बोईंग विमानात आग, 179 प्रवासी बचावले
लँडिंग गियरमध्ये बिघाड : अमेरिकेत दुर्घटना
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेत नुकतीच अहमदाबाद विमान अपघातासारखी दुर्घटना टळली. तांत्रिक बिघाडामुळे बोईंग विमानाला आग लागली. या घटनेत विमानातील 179 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले. शनिवारी अमेरिकन एअरलाईन्सच्या एका बोईंग विमानाला अपघात झाला. विमान डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर असताना विमानाच्या डाव्या मुख्य लँडिंग गियरला आग लागल्यानंतर आपत्कालीन एक्झिट दरवाजाचा वापर करून प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये लोक घाबरल्याचे दिसून येत आहेत. विमानातील प्रवासी धुराच्या लोटात विमानातून बाहेर पडताना दिसत आहेत.
मियामीला जाणारे विमान एए-3023 धावपट्टीवर असताना त्याच्या चाकांना आग लागल्याचे दिसून आले. विमानाखाली धूर निघताना पाहून प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना आपत्कालीन स्लाईड्सद्वारे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. टेकऑफपूर्वी काही मिनिटे अगोदर विमानाच्या लँडिंग गियरच्या टायरमध्ये ‘देखभाल समस्या’ निर्माण झाली. मात्र, सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षितपणे उतरल्याने जीवितहानी टळली. एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. इतर सर्व 173 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. तथापि, विमानाच्या चाकांमध्ये आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.