बॉडीबिल्डर असणारा डॉक्टर
सोशल मीडियाच्या काळात जगाच्या कानाकोपऱ्यातील घडामोडी पटकन समजत असतात. अनेकदा तर अनोख्या गोष्टी नजरेत येत असतात. सध्या चीनमधील एका डॉक्टरची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. या डॉक्टरकडे लोक सल्ला घेण्यापेक्षा अधिक त्याला पाहण्यासाठी क्लीनिकमध्ये पोहोचत आहेत.
सर्वसाधारणपणे लोक डॉक्टरकडे उपचार करवून घेण्यासाठी जात असतात. परंतु एखादा डॉक्टर बॉडीबिल्डर असेल तर आजारापेक्षा अधिक त्याला पाहण्यासाठी लोक क्लीनिकमध्ये पोहोचतात. मध्य चीनच्या गुआंगडॉन्ग प्रांतात राहणारा डॉक्टर वु तियानजेन स्वत:च्या फिटनेसमुळे चर्चेत आहे. त्याने केवळ 42 दिवसांमध्ये केलेली कमाल पाहून लोक थक्क झाले आहेत.
वु तियानजेनच्या क्लीनिकमध्ये लोक त्याला पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. 31 वर्षीय तियानजेनने केवळ 42 दिवसांमध्ये 25 किलो वजन कमी करत स्वत:चे शरीर पीळदार केले असून लोक आता त्याला मॉडेल समजत आहेत. तसेही त्याने टियानरुई कप फिटनेस अँड बॉडीबिल्डिंग मॅचमध्ये भाग घेत स्पर्धा जिंकली आहे. या स्पर्धेत भाग घेणारा तो एकमात्र डॉक्टर होता, कारण यात बहुतांश मॉडेल्स आणि कमी वयाचे युवक सामील होत असतात. झोंगनान हॉस्पिटलमध्ये सर्जन म्हणून काम करणाऱ्या वू याचे वजन मागील वर्षी 97 किलोपर्यंत पोहोचले होते, परंतु त्याने परिश्रम करत हे वजन कमी केले असून याचा परिणाम सर्वांसमोर आहे.
डॉक्टर वू स्थुलत्वाशी निगडित शस्त्रक्रिया करतो. अशा स्थितीत त्याला याविषयी चांगली माहिती आहे. त्याने फॅट घटविणे आणि स्नायू बळकट करण्याचे नियोजन केले. तो दोन तास व्यायाम करत होता आणि 6 तासांची झोप घेत होता. पहाटे साडेपाच वाजता उठून तो एरोबिक्स करायचा आणि मग हॉस्पिटलला जायचा. हॉस्पिटलमधून परतल्यावरही तो एक तास व्यायाम करत होता. स्पर्धेवेळी त्याने व्यायामाचा कालावधी वाढविला होता.