आरोपींच्या कबुलीनंतरही शरीराचे तुकडे गायब
कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
हातकणंगले तालुक्यातील रांगोळी येथील बेपत्ता लखन बेनाडे याचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे, शाहू टोलनाका येथून अपहरण करुन आजरा तालुक्यातील पेद्रेवाडी येथे नेऊन बेनाडेच्या शरीराचे सहा तुकडे केल्याचेही आरोपींनी कबुली दिली. मात्र, खुनाच्या २२ दिवसानंतरही लखनचा मृतदेह मात्र पोलिसांना सापडलेला नाही, घटनास्थळी केवळ ५ हाडेच फॉरेन्सिकच्या पथकास मिळाली.
विशाल घस्ते कारागृहात गेल्यानंतर त्याची पत्नी लक्ष्मी व लखन बेनाडे एकत्र राहत होते. यावेळी या दोधामध्ये शरीर संबंध आले. याचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी लखन लक्ष्माली देत होता त्याचबरोबर लखनने लक्ष्मी आणि तिच्या मुलांविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीच्या तक्रारी दिल्या होत्या. या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून लक्ष्मी आणि विशाल यांनी लखनचा कायमचा काटा काढण्याचे ठरविले. आम्हाला काय व्हायची ती शिक्षा होऊ दे पण लखनच्या त्रासातून मुक्ती मिळावी, यासाठी लखन बेनाडेचा खून केला.
रांगोळी येथील ग्रामपंचायत सदस्य लखन बेनाडे हा दि. १० जुलैपासून बेपत्ता होता. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस अंगलदार वैभव पाटील याना लखन बेनाडे याचा खून लक्ष्मी घस्ते, विशाल घस्ते यानी केल्याची माहिती मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने १६ जुलैला ५ जणांना अटक केली यानंतर बेनाडेच्या निर्दयी खुनाचा उलगडा झाला.
- राजारामपुरीतून पाठलाग... शाहू टोलनाक्याजवळ अपहरण
लखन १० जुलै रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात आला होता. यावेळी विशाल आणि लक्ष्मी यांच्यासोबत लखनचा वाद झाला. याचवेळी लक्ष्मीने रागाच्या भरात लखनला कायमचे संपवण्याचा कट रचला. लखन राजारामपुरी पोलीस ठाण्यात आला असता संस्कार आणि अजय दुचाकीवरुन त्याच्या मागावर होते तर आकाश, विशाल, विश्वजीत आणि आदर्श, तसेच लक्ष्मी हे मिनीबसमधून शाहू टोलनाक्याजवळ थांबले होते. लखन शाहू टोलनाका येथे आला असता, सशयित त्याला जबरदस्तीने मिनीबसमध्ये कोंबत असताना लखनने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे नागरिक जमा झाले. यामुळे संशयितांनी हा वेडा माणूस आहे. त्याला उपचारासाठी नेत असल्याचे सांगितले. बसमध्ये लखने आणखीनच दंगा करू लागला. मग लखनला विवस्त्र करुन त्याच्याच कपड्यानी त्याचे हातपाय बांधण्यात आले. टोलनाका चुकवून मिनीबस थेट गडहिंग्लज येथे नेली.
- पोल्ट्रीफार्मजवळ तोडले
मिनीबस गडहिंग्लज बाजार समिती येथे थांबली असता आकाशने साहील आणि युवराजला फोन केला. युवराजला फोन करुन घरातून हत्यार आणण्यास सांगितले. तसेच साहिलला खुनासाठी जागा बघण्याची सूचना केली. साहील भोसले ज्या पोल्ट्री फार्ममध्ये कामाला होता, त्याच्या पिछाडीस खून करण्याचे ठरले यानंतर मिनी बस पेद्रेवाडीच्या दिशेने नेली रात्री ८ वाजण्याच्या सुमारास संशयितांनी बेनाडेला लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच १० वाजता आकाशने लखनचे घड एका घावात कुन्हाडीने वेगळे केले. यानंतर लखनचे हात आणि पाय तोडण्यात आले.
- मृतदेह भरला तीन पोत्यांत
लखनचा मृतदेह तोडत असताना कधी पहाटेचे ४ वाजले याचे भानच संशयितांना राहिले नाही. पहिल्यांदा त्याचा मृतदेह पोल्ट्रीच्या कचऱ्यात जाळण्याचे नियोजन केले होते. मात्र उजाडल्यामुळे मृतदेह तीन पोत्यांमध्ये भरुन नदीमध्ये त्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले. यानुसार युवराजने पोल्ट्रीमधून तीन मोठी खाद्याची पोती आणली. या तीन पोत्यांमध्ये लखनचा मृतदेह भरण्यात आला. यानंतर मिनीबस संकेश्वरच्या दिशेने रवाना झाली.
- दोन नद्यांमध्ये टाकला मृतदेह
संकेश्वर येथील हिरण्यकेशी आणि यमगर्णी नदीमध्ये संशयीतांनी लखनच्या मृतदेहाचे तुकडे फेकल्याची कबूली दिली. हिरण्यकेशीमध्ये हात आणि पाय तर वेदगंगा नदीमध्ये धडाचे पोते फेकले आहे. पोलीस प्रशासनाने याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहाचे तुकडे अद्याप मिळून आलेले नाहीत. नदीमधील मगर आणि माश्यांनी हे खाऊन टाकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
- यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, योगेश गोसावी, राजू कांबळे, संतोष बरगे, प्रदीप पाटील, शिवानंद मठपती, अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली. या तपासाबद्दल पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आण अपर पोलीस अधिक्षक डॉ. धीरजकुमार बच्चू यांनी या टीमचे विशेष अभिनंदन करुन बक्षीस जाहिर केले होते.
- मला मारणार.... पाणी तरी पाजा
लखन बेनाडेचे सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. रात्री १० पर्यंत मिनीबसमध्ये त्याला बांधून घालण्यात आले होते. पेद्रेवाडी येथे गेल्यावर त्याचे हातपाय सोडण्यात आले. यावेळी लखनला कळून चुकले की आपला मृत्यू आला आहे. म्हणून त्याने संशयितांकडे पाण्यासाठी विनवणी केली. मला मारणार आहात... पण मला पाणी तरी पाजा, अशी विनंती हल्लेखोरांकडे केली.
- कोंबड्यांचे क्रेट आणी खाद्य
मृतदेह नेताना संशय येऊ नये, यासाठी संशयितांनी मिनीबसमध्ये कोंबड्या आणि कोंबड्यांचे खाद्य घेतले. काही कोंबड्या कापल्या होत्या. जेणेकरुन रक्ताचे डाग दिसून येऊ, नयेत अशी व्यवस्था केली होती.
अटक आरोपी : विशाल बाबुराव घस्ते, आकाश उर्फ माया दीपक घस्ते, संस्कार महादेव सावर्डे, अजित उदय चुडेकर, लक्ष्मी विशाल घरते, युवराज ऊर्फ यशवंत अरुण संकपाळ, सिकंदर सुलेमान मुल्ला, आशिष अरुण शिंत्रे, तर अजून ३ आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.