अरवाळी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला
बेळगाव : अंथरुण धुण्यासाठी गेला असता पाय घसरून धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. येळ्ळूरजवळील अरवाळी धरणात रविवारी सायंकाळी ही घटना घडली होती. सोमवारी सकाळी त्या तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. नितीन शिवराम पाटील (वय 18) राहणार कुरबरहट्टी असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. रविवार दि. 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी तो आपल्या मित्रांसमवेत अंथरुण धुण्यासाठी गेला होता. सायंकाळी 6.20 वाजण्याच्या सुमारास हातपाय धुताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने तो बुडाला होता. अग्निशमन दलाचे जवान व बेळगाव ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. रविवारी अंधारामुळे शोधमोहीम बंद करण्यात आली होती. सोमवारी सकाळी हेल्पलाईन इमर्जन्सी रेस्क्यू फाऊंडेशनचे बसवराज हिरेमठ व त्यांच्या सहकाऱ्यांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.