रशियात बेपत्ता भारतीय विद्यार्थ्याचा आढळला मृतदेह
उफा :
रशियाच्या उफा शहरात 19 दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह एका जलाशयातून हस्तगत करण्यात आला आहे. राजस्थानच्या अलवर जिल्ह्dयातील लक्ष्मणगड येथील रहिवासी अजीत सिंह चौधरीने 2023 मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी बश्किर स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला होता. तर चालू वर्षात 19 ऑक्टोबर रोजी उफा येथे बेपत्ता झाला होता. विद्यार्थी सकाळी 11 वाजण्याच्या सुमरास दूध आणण्यासाठी जात असल्याचे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडला होता, ज्यानंतर तो परतला नव्हता. आता त्याचा मृतदेह व्हाइट नदीवरील एका धरणाच्या जलाशयात मिळाला आहे.
रशियातील भारतीय दूतावासाने या घटनेची माहिती विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना दिली आहे. विद्यार्थ्याचे कपडे, मोबाइल आणि बूट 19 दिवसांपूर्वी नदी काठावर मिळाले होते. विद्यार्थ्यासोबत गुन्हा घडला असावा असा संशय त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त केला जात आहे. विद्यार्थ्याचा मृतदेह भारतात आणण्यास मदत करण्याची विनंती राजस्थानातील काँग्रेस नेत्याने विदेशमंत्री एस. जयशंकर यांना केली आहे. तसेच त्याच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.