पाकिस्तानी युवक-युवतीचा मृतदेह सीमेनजीक आढळला
जैसलमेर :
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेनजीक एक युवती अन् युवतीचा मृतदेह मिळाला आहे. हा युवक अन् युवती पाकिस्तानी नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर प्रारंभिक तपासात दोघेही प्रेमीयुगुल असल्याचा आणि भूक-तहानेमुळे यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. परंतु हे दोघेही भारतात कसे पोहोचले हे मात्र स्पष्ट झालेले नाही. भारत-पाकिस्तान सीमेनजीक तनोट अन् साधेवाला क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेपासून 10-12 किलोमीटर अंतरावरील भारतीय क्षेत्रात हे मृतदेह आढळून आले. दोघांचा मृत्यू सुमारे 4-5 दिवसांपूर्वी झाला असण्याची शक्यता आहे. दोघांच्या मृतदेहाजवळून पाकिस्तानी मोबाइल सिम आणि पाकिस्तानी ओळखपत्रं सापडली आहेत. दोघेही जवळपास 20 वर्षांपेक्षा कमी वयाचे होते. दोघेही हिंदू धर्मीय असावेत, असा अनुमान व्यक्त होत आहे. पाकिस्तानात होत असलेल्या अत्याचाराला कंटाळून ते भारतात आले असण्याची शक्यता आहे. घटनास्थळी पोलीस आणि बीएसएफचे अधिकारी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. मृतदेहांच्या उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूच्या कारणांचा खुलासा होणार आहे. युवकाचे नाव 18 वर्षीय रवि कुमार आहे. तर युवती 15 वर्षांची होती. दोघेही प्रेमीयुगुल असल्याचा अनुमान व्यक्त होत आहे. मृतदेह आढळून आल्यावर पूर्ण सीमा क्षेत्रात शोधमोहीम हाती घेण्यात आले असल्याचे बीएसएफ महानिरीक्षक एम.एल. गर्ग यांनी सांगितले आहे.
दोन्ही पाकिस्तानी नागरिक सीमेनजीक कसे पोहोचले याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. बहुधा दोघांचाही भुकेमुळे मृत्यू झाला असावा असे पोलीस अधीक्षक सुधीर चौधरी यांनी म्हटले आहे.