लीबियाच्या किनाऱ्यानजीक नौका बुडाली, 61 जणांचा मृत्यू
त्रिपोली:
लीबियाच्या समुद्र किनाऱ्यानजीक लोकांनी भरलेली एक नौका बुडाल्याने 61 जणांना जीव गमवावा लागला आहे. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. या नौकेतून सुमारे 86 जण प्रवास करत होते. हे सर्वजण युरोपमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनने (आयओएम) दिली आहे. आयओएमच्या पथकाने दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांना वैद्यकीय मदत पुरविली आहे.
युरोपला पोहोचण्याच्या प्रयत्नात जवारा शहराच्या किनाऱ्यानजीक नौका बुडाली आहे. भूमध्य समुद्र जगातील सर्वात धोकादायक मार्गांपैकी एक ठरला आहे. चालू वर्षात आतापर्यंत एकूण 15,383 अवैध स्थलांतरितांचा जीव वाचवून त्यांना लीबियात परत आणले गेल्याची माहिती आयओएमने दिली आहे.
चालू वर्षात ट्युनिशिया आणि लीबियामधून 1 लाख 53 हजारांहून अधिक शरणार्थी इटलीत दाखल झाले आहेत. लीबिया आणि ट्युनिशियाचे लोक इटलीच्या मार्गे युरोपमध्ये पोहोचण्याच्या अपेक्षेतून धोकादायक सागरी प्रवासाची जोखीम पत्करत आहेत. चालू वर्षात भूमध्य समुद्रात नौका दुर्घटनांमध्ये 2,250 हून अधिक जणांना जीव गमवावा लागला आहे.