दुखापतीमुळे ब्लंडेल मालिकेतून बाहेर
वृत्तसंस्था / ख्राईस्टचर्च
येथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा यष्टीरक्षक आणि फलंदाज टॉम ब्लंडेल याला स्नायू दुखापत झाली असल्याने तो आता या मालिकेतील उर्वरित सामन्यांत खेळू शकणार नाही. विंडीज आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी बेसिन रिझर्व्ह येथे 10 डिसेंबरपासून खेळविली जाणार आहे.
सध्या सुरू असलेल्या विंडीज विरुद्धच्या कसोटीत ब्लंडेलला फलंदाजी करताना पहिल्याच दिवशी ही दुखापत झाली होती. आता ब्लंडेलच्या गैरहजेरीत लॅथमकडे कर्णधारपद आणि यष्टीरक्षकाची जबाबदारी सोपविली आहे. लॅथमने दुसऱ्या कसोटीतील शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी न्यूझीलंडच्या डावात 250 चेंडूत 145 धावांची खेळी केली. ब्लंडेल खेळू शकला नाही तर मात्र पुढील कसोटीत नवोदित फलंदाज आणि यष्टीरक्षक मिच ए. याला संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.