रस्त्यांवर आता निळ्या रंगाचा सिग्नल
जग वेगाने बदलत असून याचबरोबर आता ट्रॅफिक सिग्नल लाइट्समध्येही मोठा बदल दिसून येत आहे. याची सुरुवात अमेरिकेतून झाली आहे. आतापर्यंत रस्त्यांवर लाल, पिवळा आणि हिरव्या रंगाची लाइट दिसून यायची. परंतु लवकरच या तिन्हींसोबत एक चौथी लाइट जोडली जाणार आहे.
फ्लोरिडाच्या ट्रॅफिक सिग्नल्सवर ब्ल्यू बीकन किंवा ब्ल्यू इंडिकेट लावण्यात येत आहे. या लाइट्स पारंपरिक ट्रॅफिक लाइटच्या वर लावण्यात येतील, परंतु महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या समोरून येणाऱ्या ट्रॅफिकला दिसणार नाहीत. तर त्यांना उलट्या दिशेने लावण्यात येणार आहे, जेणेकरून रस्त्यावर तैनात पोलीस अधिकाऱ्याला सिग्नल कधी रेड झाला हे दूरवरूनच समजू शकेल.
का लावली जातेय ब्ल्यू लाइट?
ब्ल्यू लाइटचा उद्देश चालकांना संकेत देणे नाही, तर सिग्नल आता लाल झाल्याचे पोलिसांना सांगणे आहे. रेड लाइट पेटताच ब्ल्यू लाइट चमकते, यामुळे ट्रॅफिकमध्ये मागे उभ्या पोलीस अधिकाऱ्याला कधी लाल सिग्नल लागला आणि कुठल्या गाडीने नियम मोडला हे स्पष्ट पाहता येणार आहे.
आतापर्यंत पोलिसांना अनेकदा समोर उभ्या वाहनांमुळे सिग्नल स्पष्ट दिसत नव्हता. त्यांना मान वळवून किंवा कोन बदलून रेड लाइट रनिंग पकडावी लागत होती. परंतु ब्ल्यू लाइट लागलयाने मागून सिग्नल रेड आहे की नाही आणि कोणता चालक नियम मोडत आहे हे स्पष्ट दिसणार आहे. अशाप्रकारे हा छोटासा बदल ट्रॅफिक नियम लागू करण्यास मोठी मदत करणारा ठरणारा आहे. ब्ल्यू लाइट केवळ कन्फर्मेशन सिग्नलप्रमाणे काम करते, म्हणजेच सिग्नल आता लाल झाल्याचे पोलिसांना सांगणार आहे. यामुळे अधिकाऱ्यांना रेड लाइट रनिंग पकडण्यास सोपे ठरणार आहे.
रस्ते दुर्घटना रोखण्यासाठी मोठा पुढाकार
फ्लोरिडात दरवर्षी इंटरसेक्शनवर होणाऱ्या दुर्घटना मोठ्या चिंतेचा विषय आहे. येथे दरवर्षी 800 हून अधिक लोकांचा मृत्यू तर 94 हजारांहून अधिक जण जखमी होतात. या आकडेवारीने ब्ल्यू लाइट सिस्टीम अवलंबिण्याच्या दिशेने प्रशासनाला आणखी मजबुती दिली आहे.