शंभर वर्षांमधून एकदाच बहर
‘बहुरत्ना वसुंधरा’ असे आपल्याकडे म्हटलेलेच आहे. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आश्चर्ये आणि चमत्कार आहेत. काही जणांच्या मते तर निसर्ग हा स्वत:च एक मोठा चमत्कार आहे, ज्यांचा थांग त्यावर इतके संशोधन करुनसुद्धा पाच ते दहा टक्केही लागलेला नाही, असे संशोधकच मान्य करतात. वृक्ष किंवा वनस्पती यांचे जीवनचक्र हा संशोधकांच्या नेहमीच कुतुहलाचा विषय राहिलेला आहे.
बव्हंशी वनस्पती, झाडे किंवा वृक्ष यांना वर्षातून एकदा बहर येतो. बहर याचा अर्थ असा की त्यांना फुले येतात. ही फुले या वनस्पतीचा वंश पुढे चालविण्यास कारणीभूत असतात. कारण या फुलांनंतर फळे लागतात आणि या फळांमध्ये याच वृक्षाचे बीज असते. जे रुजल्याने या वृक्षाचा वंश अव्याहतपणे सुरु राहतो. काही झाडांना वर्षातून दोनदा असा बहर येतो. तर काही वनस्पतींना तो अनेक वर्षांनी एकदा येतो. बांबूसारखी वनस्पती अनेक दशकांमधून एकदा बहरते.
तथापि, एक वृक्ष असाही आहे की ज्याला 100 वर्षांमधून एकदा फुले येतात. पूया रायमोंडी असे याच नाव आहे. हा पृथ्वीवरील सर्वात अद्भूत आणि आश्चर्यकारक वृक्ष मानला जातो. हा वृक्ष विशालकाय असून त्याचे दर्शन अत्यंत दुर्मीळ असते. तो बव्हंशी लुप्त होण्याच्या मार्गावर आहे, असे संशोधकांचे मत आहे. त्याला त्याच्या जीवनात एकदाच फुले येतात आणि तीही त्याचे वय 80 ते 100 वर्षांचे झाल्यावर. त्यामुळे त्याची फुले बहुतेक माणसांना पहावयास मिळतच नाहीत. दक्षिण अमेरिकेतील सर्व देशांमध्ये 12,000 फूट उंचीवर क्वचित प्रसंगी त्याचे दर्शन अद्याप होते. आता त्याचे संवर्धन करण्याचे आणि त्याला नामशेष होऊ न देण्याचे प्रयत्न वृक्षतज्ञांकडून जोरदारपणे केले जात आहेत.