कास पठारवर चवरच्या फुलांचा आला बहर
कास सातारा जिल्ह्यातील पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेले जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठारील नैसर्गीक रंगबेरंगी फुलांच्या हंगामाचे वेध वनविभाग वनसमिती तसेच पर्यटकांना लागल्याचे दिसून वनसमितीची हंगामाच्या नियोजनाची लगबग सुरु झाली आहे. पावसाळ्यात हंगामाच्या जास्त प्रमाणात फुलणाऱ्या चवर जातीच्या पांढऱ्या शुभ्र फुलांचा चांगल्या प्रमाणात बहर आला असून परिसरात येणाऱ्या पर्यटकांची पावले ही फुले पाहून रूळताना दिसत आहेत.
कास, बामणोली, ठोसेघर, भांबवली, एकीव परिसरात पावसाळी धबधबा पर्यटनाचा हंगाम जोरात सुरु आहे. त्यातच या परिसरात सतत तीन महिने पडणाऱ्या पावसाची दोन दिवसांपासून उघडझाप सुरू झाल्याने उन्हाच्या किरणांचा वर्षाव झाल्यास पुढील दहा-पंधरा दिवस पावसाची उघडीप मिळाल्यास विविध जाती-प्रजातींच्या फुलांच्या कळ्या उमलण्यास प्रारंभ होईल. त्यामुळे हंगामाच्या पूर्वतयारीचे वनसमितीकडून नियोजन सुरु असून कुंपणाची संरक्षक बसविली असून १३० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.
माहिती फलक लावण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असून स्वच्छता मोहीम सुरू आहे. वाहनतळ बस व्यवस्था स्वच्छतागृह आदी कामांचे नियोजन सुरु आहे.
दरवर्षी सर्वप्रथम चवरच्या फुलांना बहर येतो. त्याप्रमाणे या वर्षीही चवरची फुले चांगल्या प्रमाणात बहरली असून पठारवर ठराविक ठिकाणी पांढऱ्या फुलांची उधळण पहायला मिळत असल्याने पर्यटकांचे लक्ष वेधले जात आहे. ऊन पावसाचा खेळ सुरु राहिल्यास गेंद, तेरडा, सितेची अरव, निलीमा आदी फुलांच्या येत्या दहा पंधरा दिवसात बहारास प्रारंभ होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.