For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्तदानाला चळवळीचे स्वरूप येण्याची गरज

10:48 AM Jun 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
रक्तदानाला चळवळीचे स्वरूप येण्याची गरज
Advertisement

केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांचे प्रतिपादन

Advertisement

मनीषा सुभेदार /बेळगाव

रक्त हा असा एकमेव घटक आहे की तो मानवाच्या शरीरामध्ये तयार होतो. रक्त कोणत्याही फॅक्टरीमध्ये तयार करता येत नाही. त्यामुळे रक्तदानाचे महत्त्वही वाढले आहे. रक्तदान करण्यामध्ये आज अनेक लोक पुढाकार घेत आहेत. परंतु अद्याप त्याला चळवळीचे स्वरुप येण्याची गरज आहे. रक्ताचे महत्त्व, रक्तदान कसे करावे, याबद्दल केएलई डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटलच्या ब्लड बँकेचे डॉ. श्रीकांत विरगी यांच्याशी संवाद  साधला. मानवाच्या शरीरामध्ये साधारण 5 ते 7 लिटर रक्त असते. रक्तवाढीसाठी पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये यांसह सकस आहार महत्त्वाचा आहे. रक्ताची गरज प्रामुख्याने गर्भवतींना प्रसुतीवेळी अधिक रक्तस्त्राव झाल्यास, कर्क रुग्णांना तसेच थेलेसेमियाच्या रुग्णांना प्रामुख्याने भासते. त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करताना रक्ताची गरज भासू शकते. डॉ. विरगी यांच्या मते वय वर्षे 18 ते 60 या वयोगटातील लोकांना रक्तदान करता येते. त्यांचे वजन 45 किलोपेक्षा अधिक असावे. त्यांचे हिमोग्लोबीन 12.5 च्यावर  असायला हवे. एचआयव्ही, हिपेटायटीस बी असे कोणतेही आजार त्यांना नसावेत. शिवाय त्यांच्यावर एखादी शस्त्रक्रिया झालेली असल्यास सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झालेला असावा. याशिवाय गर्भवती, मादक पदार्थांचे सेवन करणाऱ्यांना रक्तदान करता येत नाही किंबहुना त्यांचे रक्त स्वीकारले जात  नाही.साधारण एका व्यक्तीच्या शरीरातून 350 ते 450 मिली रक्त घेण्यात येते. तत्पूर्वी काविळ, टायफॉईड, एचआयव्ही, व्हीडीआरएल व मलेरिया पॅरासाईट याची चाचणी केली जाते. शिवाय रक्तगटही काढून दिला जातो. बाहेर या सर्व तपासणीसाठी शुल्क द्यावे लागते. मात्र, रक्तदानाच्या निमित्ताने या सर्व चाचण्या विनामूल्य होतात, हे महत्त्वाचे.

Advertisement

एका व्यक्तीने दिलेल्या रक्तामधून प्लेटलेट्स, फ्रेश फ्रोझनप्लाझ्मा, रेड ब्लड सेल्स व कायोप्रिसिप्रिटेड हे चार घटक बाजूला काढले जातात व ज्या रुग्णाला यापैकी कोणत्या घटकाची गरज आहे. त्यानुसार ते रक्त पुरविले जाते. म्हणजेच एका व्यक्तीचे रक्तदान चार जणांना उपयुक्त ठरते. वर्षाला एक व्यक्ती चारवेळा रक्तदान करू शकते, अशी माहिती डॉ. विरगी यांनी दिली. रक्त दिल्याने रक्त कमी होते, हा गैरसमज आहे. 24 तासांत नवीन रक्त तयार होते. रक्तदानामुळे कोलेस्ट्रॉल, बीपी, नियंत्रित राहते, असेही ते म्हणाले. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला एक कार्ड देण्यात येते. त्याच्यापैकी कोणालाही रक्ताची गरज भासल्यास त्याला प्राधान्य देऊन सवलत देण्यात येते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. केएलई ब्लड बँकेमध्ये स्वेच्छेने येऊन रक्तदान करणारे असंख्य तरुण आणि ज्येष्ठ नागरिकसुद्धा आहेत. परंतु प्रामुख्याने मुलींचे प्रमाण अधिक आहे हे विशेष. गतवर्षी या ब्लड बँकेमध्ये 16,565 युनिट रक्त संकलन झाले. त्यामध्ये स्वेच्छेने येऊन रक्तदान करणारे 15,700 जण आहेत.

वर्षभरातील ब्लड बँकेमध्ये संकलित झालेल्या रक्ताचा तपशील

 • एकूण रक्त 16,565 युनिट
 • स्वेच्छेने केलेले रक्तदान 15,700
 • बँकेने घेतलेली शिबिरे 113
 • एचआयव्ही पॉझिटिव्ह 16
 • हिपेटायटीस बी 4 टक्के
 • हिपेटायटीस सी 8 टक्के
 • व्हीडीआरएल 0.4 टक्के
 • मलेरियन पॅरासाईट 0 टक्के
 • बँकेने पुरविलेले रक्त 30 हजार व्यक्ती
 1. रक्तपेढी  जाने. ते डिसें.-23  जाने. ते जून-24  रक्तदान शिबिरे
 2. केएलई ब्लडबँक  16,565 (स्वेच्छेने  15,700) -  113
 3. बिम्स  7,550  3,630  100 हून अधिक
 4. बेळगाव ब्लडबँक  7,000  2,500  25 ते 30
 5. महावीर ब्लडबँक  3,192  1,078  30

रक्तगटाचा शोध

नेमका रक्तगट कळाल्याने वैद्यकीय क्षेत्राला हे संशोधन वरदानच ठरले. डॉ. कार्ल लँडस्टीनर यांनी रक्तगटाचा शोध लावला. 14 जून हा त्यांचा जन्मदिवस. तोच दिवस रक्तदान दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो.

दरवर्षी रक्तदान शिबिरे

याशिवाय दरवर्षी 27 फेब्रुवारी या भाषा दिनादिवशी लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी रक्तदान शिबिराचे आयोजन करते. तसेच मारवाडी युवा मंच, जितो, रोटरी, लायन्स, इनरव्हील, शनैश्चर मंडळ यासह शहरातील असंख्य संस्था दरवर्षी रक्तदान शिबिरांचे आयोजन करतात.

Advertisement
Tags :

.