रक्त गोठविणारे गांव
थंडीच्या मोसमाला प्रारंभ झाला आहे. प्रत्यक्षात थंडी अद्याप पडलेली नसली, तरी कालावधी तोच आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आदी राज्यांमध्ये थंडीच्या दिवसात काहीवेळा आपल्याला काकडायला होते. तसेच स्वेटर आदी ऊब देणाऱ्या वस्तू उपयोगात आणाव्या लागतात. पण या जगात अशी अनेक स्थाने आहेत, की तेथे कडाक्याची थंडी पडते. अगदी शून्य अंश सेंटीग्रेडच्याही बरेच खाली तापमान जाते. रशियाचा सैबेरिया हा भाग असा अतिथंड आहे. त्याला हिमाचे वाळवंटच म्हटले जाते. या सैबेरियात ‘याकुटीया’ नामक एक गाव आहे.
हे गाव जगातील सर्वात थंड गाव म्हणून ओळखले जाते. येथे उन्हाळा असा कधी येतच नाही. येथील जास्तीतजास्त तापमान -40 डिग्री सेल्शियस असून ते निर्माण झाले की या गावातील लोक तापमान खूपच वाढले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करतात. -68 अंश सेल्शियस हे तापमान ‘सहनीय’ असल्याचे मानले जाते. येथे जेव्हा हिंवाळ्याची परमावधी असते तेव्हा तापमान -80 ते -100 अंश सेल्शियस इतके खाली जाते. इतके कमी तापमान म्हणजे नेमका असा अनुभव असतो, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. या गावी नेहमीच लोक ‘डीप फ्रीझ’ मध्ये ठेवल्यासारखे असतात. आपल्यासारख्यांना कितीही ऊबदार कपडे घातले तरी अशा स्थानी काही मिनिटेही राहवणार नाही. या गावातील लोकांना अशा स्थितीची सवय असल्यानेच ते तग धरु शकतात. त्यांचे कपडे याच भागात सापडणाऱ्या केसाळ प्राण्यांच्या कातड्यांपासूनचे असतात. घरातसुद्धा त्यांना गुढघ्यापर्यंत पोहचणारी जाड पादत्राणे किंवा बूट घालावे लागतात. येथे हीटर्स फारसे नाहीत. त्यामुळे लाकूडफाटा जमवून त्याच्या शेकोटीचीच ऊब घ्यावी लागते.