वळसंगात म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी रास्ता रोको
वळसंग, वार्ताहर
जत तालुक्यातील वळसंग येथील जत- चडचण रस्त्यावर म्हैशाळ योजनेच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. म्हैशाळ योजनेचे अधिकारी विजय कांबळे व आमदार विक्रम दादा सावंत यांनी पाणी देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनाला आमदार विक्रम सावंत, तुकाराम बाबा महाराज यांनी पाठिंबा दिला.
जत तालुक्यातील वळसंग, शेड्याळ,पाच्छापूर ,काराजनगी ,कोळगीरी, दरिकोनूर येथे पिण्याची पाण्याची भीषण टंचाई आहे. या गावातील परिसरातील तलावामध्ये म्हैशाळ योजनेचे पाणी सोडले असता पिण्याचा पाण्याचा प्रश्न सहज सुटू शकतो. या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नासाठी वळसंगसह परिसरातील शेतकऱ्यांनी जत -चडचण रस्त्यावर सकाळी साडेदहापासून एक पर्यंत रास्ता रोको करीत होते. प्रशासनाचे कोणतेही अधिकारी फिरकले नाहीत. आंदोलनकर्त्यांची आक्रमकता पाहून आमदार विक्रम दादा सावंत व म्हैशाळ योजनेचे अधिकारी विजय कांबळे यांनी आंदोलन कर्त्याशी चर्चा करून आठ तारखेच्या आत पाणी देण्याचे आश्वासन दिले. या रास्ता रोकोमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे व लहान मुलांचे हाल झाले.
यावेळी सरपंच पूजा माळी , विनोद जाधव भगवानदास केंगार व महेश कोळी, विश्वनाथ माळी, रमेश माळी, केंचराव वगरे, संजय शिंदे, संतोष चव्हाण ,ईश्वर चमकेरी रमेश पोतदार, गुंडू सरगर, दिनेश सावंत यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.