Kolhapur News: 'त्या' दोघींच्या जीवनाचा नवा अध्याय सुरु, कोमल आणि प्रणाली अंधशाळेत दाखल
आई शाळेतून निघून गेली आणि त्यांना आईची पोकळी जाणवू लागली
By : सुधाकर काशीद
कोल्हापूर : या दोघी सख्ख्या बहिणी. त्यांचं नाव कोमल आणि प्रणाली. एकीचं वय सहा एकीचे सात, मात्र दोघीही जन्मत: अंध. त्यामुळे कशाचंही त्यांना दर्शन नाही. आईचा चेहराही त्यांना माहित नाही. आई-वडील अन्य कुटुंबीयांनी या दोघींची खूप चांगली काळजी घेतली. आता या दोघींना शिक्षण, इतर ज्ञान मिळावे म्हणून त्यांना आज त्यांनी मिरजकर तिकटीच्या निवासी अंधशाळेत दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली.
दोघींना अंधशाळेत दाखल करायला त्यांची आई आली होती. पण दोघींना शाळेत दाखल करून घरी जाण्याचा क्षण थोडाही सहन होणार नाही म्हणून त्यांची आई लगेच तिथून निघून गेली. पण शाळेत आई असेपर्यंत या दोघींना जवळपास आई नक्की आहे, हे जाणवत होते. पण आई शाळेतून निघून गेली आणि त्यांना आईची पोकळी जाणवू लागली. आई..आई शब्द त्यांच्या ओठातून बाहेर पडायला सुरुवात झाली.
कोल्हापुरात मिरजकर तिकटीला ज्ञानप्रबोधन संचलित अंधशाळा आहे. शाळेत 40 अंध मुले आहेत. सुट्टीला गेलेली मुले सोमवारी शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी आली नाहीत. दोन दिवसांत सर्व मुले येतील. पण आज कोमल आणि प्रणाली या सख्ख्या बहिणींना शाळेत दाखल करण्यासाठी त्यांची आई आणि कुंटुबीय त्या दोघींना घेऊन आली.
शाळेने त्यांच्या स्वागताची तयारी केली. कोमल आणि प्रणाली आता याच शाळेत राहणार आहेत. अर्थातच त्यामुळे घराची, आईची साथ त्यांना सोडावी लागणार होती. त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीचा मार्ग दिसावा, त्यांना जगाची ओळख व्हावी, यासाठी ही ताटातूट नक्कीच अटळ होती. पण त्यांच्या भावी वाटचालीसाठी ती आवश्यकच होती.
कोमल आणि प्रणाली या दोघी मंगळवारी सकाळी दहा वाजेपर्यंत कुटुंबाच्या सानिध्यात होत्या. पण त्यांच्या कुटुंबीयांनी या दोघी डोळस व्हाव्यात, शिकून मोठ्या व्हाव्यात, यासाठी अंधशाळेत त्यांना दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण प्रत्यक्ष या दोघींना शाळेत सोडून जाण्याचा क्षण आला, तेव्हा साऱ्या कुटुंबीयांना डोळ्यातून येणारे पाणी थांबवणे केवळ अशक्य झाले. पण हे करावेच लागणार असल्याने दहा वेळा या दोघींकडे फिरून-फिरून मागे बघत आईने अंधशाळेचा निरोप घेतला.
त्यानंतर काही क्षण गेले आणि या दोघींचा शाळा स्वागत प्रवेश सुरू झाला. शाळेतील महिला कर्मचाऱ्यांनी रांगोळी घातली. दोघींचे औक्षण केले आणि शाळेच्या मुख्य हॉलमध्ये या दोघींना आणले. इथपर्यंत सारे ठिक होत. पण आपल्या जवळपास आई कुठे नाही, याची जाणीव कोमल, प्रणालीला होऊ लागली.
आईची पोकळी त्यांना जाणवू लागली आणि आई कुठे गेली, अशी या दोघींची विचारणा सुरू झाली. शाळेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचाऱ्यांनी या दोन्ही गोड मुलींची समजूत काढायला सुरुवात केली. त्यांना खेळायला खेळणी दिली. त्यांची ओवाळणी केली आणि कोमल आणि प्रणालीच्या डोळ्यातील अंधकारात ओवाळणीच्या ताटातील निरांजने चमकू लागली.
मुलांची नियमित आरोग्य तपासणी
अंधशाळेतील मुलांची ठराविक महिन्यांनी आरोग्य, डोळे तपासणी केली जाते. एखाद्या मुलाला थोडे जरी दिसू शकेल, असा रिपोर्ट आला तर त्याच्यावर उपचार करून त्याला पुन्हा थोडीतरी दृष्टी देण्याचा प्रयत्न येथे होतो.
त्यांना मुलांप्रमाणे जपतात शिक्षक अन् कर्मचारी
"अंधशाळेत प्रवेश करणाऱ्या अंध मुलांच्या प्रवेशाचा पहिला दिवस असाच डोळ्यात पाणी येण्याचा असतो. लहान मुलांना आई-बाबा, दादा, आजोबा, मामा यांची आठवण पहिले काही दिवस होतेच. पण येथेच आमची कसोटी असते. मुलांना आपल्या मुलाप्रमाणे येथील शिक्षक, कर्मचारी जपतात. आम्ही त्यांना डोळस करण्याचा प्रयत्न करतो."
- प्रकाश पाटील, मुख्याध्यापक, अंधशाळा