बलुचिस्तानात स्फोट, पाकिस्तानचे 6 सैनिक ठार
पहिल्यांदाच आत्मघाती स्फोटासाठी महिलेचा वापर
वृत्तसंस्था/ क्वेटा
बलुचिस्तानातील सशस्त्र संघटना बलूच लिबरेशन फ्रंट म्हणजेच बीएलएफने आत्मघाती महिला सदस्याचा वापर करत पाकिस्तान फ्रंटियर कॉर्प्सच्या अत्यंत सुरक्षा प्राप्त कॉम्प्लेक्सवर हल्ला केला आहे. बलुचिस्तानच्या चगाई येथील या कॉम्प्लेक्समध्ये चिनी कॉपर तसेच गोल्ड मायनिंग प्रकल्पाचे केंद्र आहे. येथे झालेल्या आत्मघाती स्फोटा 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत. बीएलएफने पहिल्यांदा पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या विरोधात आत्मघाती महिला सदस्याचा वापर केला आहे. यापूर्वी बलुचिस्तानातील अन्य सशस्त्र संघटना बलूच लिबरेशन आर्मीच्या (बीएलए) मजीद ब्रिगेडने अशाचप्रकारे आत्मघाती महिलेचा वापर केला होता.
बीएलएफने आत्मघाती बॉम्बर जरीना रफीक उर्फ ट्रांग माहूचे एक छायाचित्र जारी केले आहे. जरीनाने बीएलएफ सदस्यांना मुख्य परिसरात दाखल करविण्यासाठी बॅरिकेडिंगच्या ठिकाणी स्फोट घडवून आणल्याचे बीएलएफकडुन सांगण्यात आले. तर संबंधित परिसरात चिनी कंपन्या आणि कॅनडाच्या कंपनीकडून प्रकल्प राबविले जात आहेत.
आत्मघाती मोहिमेला समुहाच्या सुसाइड युनिट सद्दो ऑपरेशन बटालियने घडवून आणले आहे. आत्मघाती हल्ला करणाऱ्या या युनिटला कमांडर वाजा सद्दो उर्फ सदाथ मारीचे नाव देण्यात आले असल्याचे बीएलएफने सांगितले आहे. याचदरम्यान बीएलएने 28-29 नोव्हेंबरदरम्यान अनेक ठिकाणी हल्ले केल्याची माहिती दिली आहे.