शिवोलीतील महिलेस कोटीचा गंडा घालणाऱ्या सराफीला अटक
सराफीचे 40 लाख ऊपये गोठवले : कागदपत्रांसह एक मोबाईल जप्त,सायबर विभागाने केली कारवाई
पणजी : गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हा विरोधी विभागाने आंध्र प्रदेशातील एका 53 वर्षीय सराफीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318, 319(2), 336(3) तसेच आयटी कायदा कलम 66 (डी) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. संशयिताने व्हॉट्सअपवर दिल्ली पोलिस अधिकाऱ्याची तोतयागिरी करून मारना, शिवोली येथील महिलेची 1 कोटी ऊपयांची फसवणूक केली आहे. सायबर पोलिसांनी त्याला शिताफिने अटक केली असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती सायबर गुन्हा विरोधी विभागाचे अधीक्षक राहूल गुप्ता यांनी दिली.काल मंगळवारी रायबंदर येथील सीआयडी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहूल गुप्ता यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्या सोबत इतर अधिकारीही उपस्थित होते. संशयिताचे नाव यरमाला व्यंकटेश्वरलू (53, विजयवाडा आंध्र प्रदेश) असे असून त्याने रसायनशास्त्रात एमएस्सी केले असून विजयवाडा येथे त्याचे सराफी दुकान आहे.
आंध्र प्रदेशातील सराफीने असा घातला गंडा
पीडितेला 917664984274 या क्रमांकावरून व्हॉट्सअप कॉल आला. संशयिताने तिच्याकडे खोटा दावा केला की तिच्याविऊद्ध मनी लॉन्ड्रिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तिला आणखी धमकावण्यासाठी त्याने भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची बनावट पत्रे पीडितेला पाठवली आणि 26 ते 28 डिसेंबर 2024 दरम्यान 1 कोटी ऊपये बनावट खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास पीडितेला भाग पाडले. या कालावधीत घोटाळेबाजाने या महिलेला ’डिजिटल अॅटेक’ मध्ये ठेवले होते. आरोपीने पीडितेला आश्वासन दिले की जोपर्यंत तपासात तिच्याकडून कोणतीही चूक होत नाही तोपर्यंत पैसे सुरक्षित कोठडीत ठेवले जातील.
याबाबत सायबर गुन्हा विराधी विभागाकडे तक्रार येताच पोलिसांनी तपासकामाला सुऊवात केली असता फसवणूक प्रकाराची नाळ विजयवाडापर्यंत जोडली असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी विजयवाडा येथे जाऊन संशयिताला शिताफिने अटक केली. त्याच्याकडून एक मोबाईलही जप्त केला तसेच त्याच्या एका खात्यातील 40 लाख ऊपयांची रक्कमही गोठविली आहे. ही कारवाई उपनिरीक्षक नविन नाईक, कॉन्स्टेबल भालचंद्र नाईक, महेश नाईक, यांनी अधीक्षक राऊल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक अक्षत आयुष, उपअधीक्षक सुरज हळर्णकर आणि निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. पैसे हस्तांतरित करण्यापूर्वी नेहमी बँक खातेदाराचे नाव तपासणे महत्वाचे आहे. काही संशयिस्पद आढळ्यास तत्काळ रायबंदर येथील सायबर गुन्हे पोलिसस्थानकाच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचा सल्ला राहूल गुप्ता यांनी दिला आहे.