रेल्वे तिकीटांचा काळाबाजार रडारवर
कोल्हापूर :
रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट विक्रीच्या माध्यमातून काळाबाजार करणारे एजंट रेल्वे पोलिसांच्या रडारवर आहेत. कोल्हापुरातील अशा प्रकारे तिकीट विक्री करणाऱ्या एका एजंटावर गुरूवारी कारवाई झाल्याने अशा प्रकारे जादा दराने तिकीट विक्री करणारे शहरातील इतर एजंटाचे धाबे दणाणले आहेत. आणखीन 5 ते 6 ठिकाणी अशा प्रकारे काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडे आली आहे. त्यांच्यावरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे.
रेल्वेतून लांब पल्याच्या प्रवासासाठी प्रवासी आरक्षित तिकीट खरेदी करतात. अनेकांना वेळीच तिकीट मिळत नाहीत, मात्र काही कारणाने तातडीने प्रवास करायचा असतो. अशा गरजू प्रवाशांना हेरून त्यांना जास्त दरात तिकिटे देण्याची टोळी सक्रीय झाली आहे. तत्काळ आरक्षित तिकीटामध्ये अशा प्रकाराचा काळबाजार होत असल्याचे अनेकवेळा उघडकीस आले आहे. आता ऑनलाईन तिकीट खरेदीमध्येही काळबाजार करणारे एजंट असल्याचा पर्दापाश झाला आहे. अशा बेकायदेशीर तिकीट विक्री विरोधात रेल्वे पोलिसांनी राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. कोल्हापुरातूनही ऑनलाईन स्वरूपात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती पुणे व मिरज रेल्वे पोलिसांना मिळाली होती. त्याच्या तपासासाठी रेल्वे पोलिसांच्या गोपनीय शाखेचे एक पथक गुरूवारी कोल्हापुरात आले. बाबूजमाल तालीम परिसरातील एका टूर्स कंपनीच्या दुकानावर त्यांनी छापा टाकला.
- एका तिकीटासाठी 100 रूपयांचे कमिशन
बाबुजमाल रोडवरील टूर्स कंपनीच्या दुकानातील एकाकडे ई तिकीट घेण्याचा यूजरनेम होता. त्या आधारे तो प्रवाशांना ऑनलाइन तिकिटे काढून देत होता. याशिवाय एका तिकिटामागे 100 रुपये कमिशन घेत असल्याचेही तपासात समोर आले. जादा दराने तिकीट विक्री करणाऱ्या एजंटास गुरूवारी रात्री रेल्वे पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्याची जामिनीवर सुटका करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.
- सायबर क्राईमचा प्रकार
तिकीट काढण्यासाठी युजर नेमची आवश्यकता असते. यामाध्यमातून वास्तविक एकावेळी एक व्यक्ती एकच तिकीट काढू शकतो. गुरूवारी झालेल्या कारवाईत एजंटकडे 22 युजर आयडी असल्याचे समोर आले. काही तांत्रिक क्लुप्त्या करून त्याने बेकायदेशीर युजर आयडीचा वापर केल्याचे निदर्शनास आले. तपासणीमध्ये 1 लाख 72 हजारांची 65 रेल्वे तिकीट मिळाली आहेत. सायबर क्राईमचा हा प्रकार आहे.
ऑनलाईन तिकीट विक्रीत काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्याने रेल्वे पोलिसांकडून कारवाई सुरू केली आहे. जशी माहिती मिळेल, तशी जादा दाराने ऑनलाईन तिकीट विक्री करणाऱ्या दुकानांवर छापा टाकून कारवाई केली जाणार आहे. शहरात अशा प्रकारचे आणखीन 5 ते 6 दुकाने रडारवर आहेत.
विजयकुमार मांझी, पोलिस निरिक्षक, कोल्हापूर रेल्वे पोलिस