मेळघाटात अघोरी अंधश्रद्धेने २२ दिवसाच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात
२२ दिवसाच्या बाळाच्या पोटाला दिले चटके
अमरावती
मेळघाटातील चिखलदारा तालुक्यात अंधश्रद्धेच्या आहारी गेल्याने एक २२ दिवसाच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात गेल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. २६) रोजी उघडकीस आला. हतरू आरोग्य केंद्रांतर्गत ग्राम सिमोरी येथे २२ दिवसाच्या बाळाच्या पोटाला गरम सळीने तब्बल ६५ चटके दिले गेले. या अघोरी प्रकारामुळे त्या चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक झाली आहे. या मुलाला अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सामोरी येथील या मुलाला कोणतातरी ही आजार असल्याचे लक्षात आले. या आजारावर उपचार म्हणून या २२ दिवसाच्या बाळाला लोखंडी विळा गरम करुन तब्बल ६५ वेळा चटके दिले गेले. या चटक्यामुळे चिमुकल्याचे पोट जागोजागी जळले गेले. या जखमांमध्ये इन्फेक्शन झाल्याने या बाळाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे.
या मुलास पहिल्यांना हतरु आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र प्रकृती खालावल्यामुळे त्याला अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात रेफर केले. तिथून त्याला जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती येथे दाखल करण्यात आले. या मुलाची प्रकृती चिंताजनक झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.