Sanjay Savkare Kolhapur Toor: स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी संजय सावकारेंना काळे झेंडे का दाखवले?
CM फडणवीस आणि महायुती सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले
कोल्हापूर : राज्यातील सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाली. स्वाभिमानी सघंटनेच्यावतीने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी, म्हणून मंत्री संजय सावकारे यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे कालपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान, स्वाभिमानीकडून काळे झेंडे दाखवत त्यांनी या दौऱ्याचा व सरकारचा निषेध केला. मंत्री सावकारे हातकंणगले जवळ आले असता संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
राज्यात शेतकरी आत्महत्या वाढत असून रोज 10 शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारकडून संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र महायुतीचे नेते आता कर्जमाफी करता येणार नाही अशी वक्तव्य करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांकडून मंत्री सावकारे यांना काळे झेंडे दाखवून सरकारच्या या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
विधानसभा निवडणुकीदरम्यान, महायुती सरकारने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणि आश्वासने देण्यात आली होती. तसेच राज्यातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर महायुती सरकारच्या नेत्यांनी कर्जमाफी संदर्भात सकारात्मक व्यक्तव्य केलेली नाहीत. त्यामुळे आता कर्जमाफी होणार की नाही यावरुन शेतकरी संभ्रमात आहेत. दरम्यान, कर्जाच्या ओझ्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असून सरकारने मतांसाठी शेतकऱ्यांची फसवणूक केली असे स्वाभिमानी सघंटनेचे मत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तापणार का असा सवाल उपस्थित होत आहे.