ब्लॅक बॉक्स अद्यापही भारतातच
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर इंडियाच्या अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमानाचा ब्लॅक बॉक्स अद्यापही भारतातच असून त्याची तपासणी केली जात आहे,अशी माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी दिली आहे. हा ब्लॅक बॉक्स तपासणीसाठी अमेरिकेला पाठविला जाईल, असे वृत्त प्रथम देण्यात आले होते. तथापि, सध्यातरी भारतातच त्याची तपासणी केली जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
विमानाला पडल्यानंतर प्रचंड आग लागल्याने त्याच्या ब्लॅक बॉक्सच्या बाह्या आवरणाची हानी झाली आहे. मात्र, त्याच्यात साठलेली माहिती सुरक्षित आहे. ती मिळविण्याचे प्रयत्न केले जात असून तिचे विश्लेषण करण्यात येणार आहे. बॉक्स अमेरिकेला पाठविण्याचा निर्णय प्रथम घेण्यात आला होता. तथापि, आता भारतातच त्याची तपासणी विमान आपदा अन्वेषण कक्षाकडून केली जात आहे. भारतात ही तपासणी होऊ शकेल अशी शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्याच वेळी दिले स्पष्टीकरण
हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठविला जाणार आहे, असे वृत्त अनेक वृत्तमाध्यमांनी नागरी विमान वाहतूक विभाग अधिकाऱ्याच्या वक्तव्याचा संदर्भ घेऊन दिले होते. तथापि, विमान आपदा अन्वेषण कक्षाचे प्रमुख जीव्हीजी युगंधर यांनी हे वृत्त त्याचवेळी फेटाळले होते आणि ते बनावट असल्याचे स्पष्ट केले होते. तरीही अनेकांचा समज ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठविण्यात आला आहे, असा असल्याने नागरी विमान वाहतूक मंत्री नायडू यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.