भुतरामहट्टीतील काळविटांचा संसर्गजन्य रोगामुळे मृत्यू
वनमंत्री ईश्वर खंड्रे यांची विधानपरिषदेत माहिती
बेळगाव : भुतरामहट्टी येथे कित्तूर राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालयातील 31 काळविटांचा मृत्यू हेमोरॅजिक सेप्टिसेमिया या संसर्गजन्य रोगामुळे झाला आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केले नसून संसर्गामुळे काळविटांचा मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. एकूण 38 काळविटांपैकी 31 काळविटांचा मृत्यू झाला असून रोगाचे निदान त्वरित झाल्याने 7 काळविटांचा जीव वाचविण्यात यश आल्याची माहिती वनमंत्री ईश्वर खंड्रे यांनी दिली.
आमदार डॉ. साबण्णा तळवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, काळविटांच्या मृत्यूची माहिती मिळताच आपण त्वरित बेंगळूर व हेब्बाळ तज्ञ डॉक्टरांसह पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना भुतरामहट्टीला पाचारण केले होते. तज्ञ डॉक्टर प्राणीसंग्रहालयाला पोहोचून त्वरित सूत्रे हाती घेतली. यानंतर प्राणीसंग्रहालयातील इतर प्राण्यांना प्रथम रोगप्रतिबंधक लसीकरण केले. यानंतर काळविटांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे काम हाती घेऊन मृत प्राण्यांची तपासणी केली. त्यांच्या रक्ताचे व अवयवयांचे नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले.
प्राणी संग्रहालयातील इतर प्राण्यांमध्ये संसर्गजन्य रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. एक दोन दिवसांच्या अंतराने 38 पैकी 31 काळविटांचा मृत्यू झाला. सदर मृत्यू अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे झाला नसून हेमोरॅजिक सेप्टिसेमिया या संसर्गजन्य रोगामुळे झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तज्ञ पशुवैद्यांच्या मार्गदर्शनामुळे 7 काळविटांना क्वॉरंनटाईन करण्यात आले होते. त्यांच्यावर तज्ञांच्या सूचनेनुसार उपचार करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचविण्यात यश आले.
मागील सरकारच्या काळात राज्यातील प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. मागील सरकारच्या कार्यकाळात प्राण्यांच्या मृत्यूचा दर 6.5 टक्के होता. काँग्रेस सरकारने प्राण्यांची काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. तसेच आपण स्वत: प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून होतो. परिणामी दोन वर्षांच्या योग्यरित्या राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे मृत्युदरात मोठी घट झाली आहे. 2024-25 मध्ये 3.2 टक्के, 2025-26 मध्ये प्राण्यांच्या मृत्युदरात आणखी घट होऊन 2.5 टक्के इतका दर राहिला आहे. यामुळे आपले सरकार प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी योग्यरित्या वाटचाल करत असल्याचा निर्वाळाही मंत्री खंड्रे यांनी दिला.
दुर्लक्षामुळे काळविटांचा मृत्यू
तत्पुर्वी, डॉ. साबण्णा यांनी, काळविटांचा मृत्यू होणे हे सरकारचे अपयश आहे. मुक्या प्राण्यांचा जीव सर्वांसाठी महत्त्वाचा असून प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे काळविटांचा मृत्यू झाल्याचा आरोप डॉ. साबण्णा यांनी केला. तसेच राज्यातील सर्व प्राणी संग्रहालयातील प्राण्यांच्या संरक्षणासाठी राज्य सरकार कोणत्या उपाययोजना राबवत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.