पाकिस्तान, चीनला बीएलएचा इशारा
जिवंत रहायचे असेल तर बलुचिस्तान सोडा
वृत्तसंस्था/ पेशावर
बलुचिस्तानात पाकिस्तानचे सैन्य आणि पंजाबी प्रांताशी संबंधित लोकांवर हल्ले केल्यावर बीएलएने आता चीनला धमकाविले आहे. बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) एक व्हिडिओ जारी केला असून यात बलूच सदस्य चनी आणि पाकिस्तानला धमकी देताना दिसून येतात. ही भूमी केवळ आमची आणि आमचीच आहे. चीन आणि पाकिस्तानने या भूमीवर शिरकाव केला तर प्रचंड नुकसान सहन करावे लागेल. चीन आणि पाकिस्तानच्या लोकांना जिवंत रहायचे असेल तर त्यांनी बलुचिस्तान सोडून जावे असे बीएलए माजीद ब्रिगेडकडून धमकाविण्यात आले आहे.
बलुचिस्तानात बीएलएने रविवारी आणि सोमवारी सुरक्षा दल तसेच लोकांवर भीषण हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये 100 हून पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचा दावा बीएलएने केला आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानात स्वत:च्या सैनिकांची तैनात वाढविण्याचा विचार करू नये. पाकिस्तान आणि चीनचे लोक बलुचिस्तानात राहत असतील तर त्यांना आमच्या हल्ल्यांना सामोरे जावे लागेल असे बीएलएने म्हटले आहे.
ऑपरेशन हेरोफ
बीएलएकडून ‘ऑपरेशन हेरोफ’ राबविण्यात आले असून यात एक सैन्यशिबिर आणि सैन्यचौक्यांना लक्ष्य करण्यात आले आहे. या हल्ल्यांमध्ये 102 पाकिस्तानी सैनिक मारले गेले असून याची जबाबदारी बीएलएने स्वीकारली आहे. या ऑपरेशनमध्ये बीएलएच्या माजीद ब्रिगेडच्या आत्मघाती पथकाने भाग घेतला होता. माजिद ब्रिगेडच्या कारवाईत बेला सैन्य शिबिराच्या मोठ्या हिस्स्यावर कब्जा करणे आणि सैन्य ताफ्यावर हल्ले करत पूर्ण प्रांतात स्वत:च्या चौक्या निर्माण करण्यात आल्या आहेत. बेला येथील सैन्य तळावर करण्यात आलेल्या हल्ल्यात 40 हून अधिक सैनिक मारले गेले आहेत. बीएलएच्या आत्मघाती शाखेने शिबिराच्या एका महत्त्वपूर्ण हिस्स्यावर नियंत्रण मिळविले आहे.