महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या विजयाने विरोधकांचे ताबूत थंडावले

06:33 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तीन राज्यांच्या निवडणुकीतील विजयाने स्फुरण पावलेल्या भाजपाला जम्मू आणि काश्मीरवरील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे अत्यानंद झालेला आहे. पुढील महिन्यात अयोध्येतील भव्य राम मंदिराचे उदघाटन झाल्यावर लोकसभा निवडणूकांना जोमाने सामोरे जाऊन विरोधकांचा पाडाव करायचा चंग त्याने बांधला आहे. ‘एक धक्का और दो’ ही विश्व हिंदू परिषदेची जुनी घोषणा काँग्रेसचा ‘आजा, बीजा आणि आता तिजा’ करण्यासाठी वापरली गेली तर नवल ठरणार नाही.

Advertisement

 

Advertisement

सेन्सेक्समध्ये विक्रमी वाढ होत असताना भाजपचा राजकीय सेन्सेक्स अस्मानाला भिडत आहे. काही निवडणूक तज्ञ तर चार महिन्यावर आलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची मतांची टक्केवारी तीन ते पाच टक्क्यांनी वाढलेली दिसेल असे छातीठोकपणे म्हणू लागले आहेत. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा हॅटdिट्रक करणार यात तिळमात्र शंका नाही असे सांगत आहेत. मोदींच्या स्तुतीपाठकांची अजिबात कमी नसल्याने भाजपच्या तीन राज्यातील यशाचा डंका अजूनच मोठ्याने वाजवला जातोय.

अशा वेळी विरोधकांच्या तंबूत मात्र स्मशानशांतता आहे. त्यांचे ताबूत थंडावले आहेत. ‘कोई उमीद नजर नही आती’, अशा प्रकारचे निराशामय वातावरण असून मोदींसमोर कोणताही चेहरा उभा केला तरी त्याचे बारा वाजणार हे ठरलेले आहे, असे मीडियातील एक गट ठासून सांगत असल्याने अगोदरच गळून गेलेले विरोधक गलितगात्र होत आहेत. गेली दहा वर्षे बरेच टक्केटोणपे खाल्लेले विरोधक कोठेतरी ‘एखादी तरी स्मितरेषा’ दिसत नसल्याने धास्तावले आहेत. राजकारणात चढउतार चालायचेच असे समजून काही विरोधक मात्र शांतपणे साऱ्या परिस्थितीकडे बघत आहेत. आपले कोठे काय चुकते आहे, याचे मंथन सुरु झाले आहे. भाजपच्या या वादळाला विरोधी पक्ष कशा रीतीने सामोरे जाणार याची चुणूक पुढील आठवड्यातील इंडियाच्या बैठकीत मिळणार आहे. भाजपचा पराभव करणे अवघड आहे पण अशक्य नाही असे दावे विरोधी रणनीतीकार करत आहेत. कोणी ‘एकास एक’ चा मंत्र देत आहे तर कोणी एका जबर आर्थिक आणि सामाजिक लाभांची जादू पसरवण्याची गोष्ट करत आहे. एक आकर्षक कॉमन मिनिमम प्रोग्राम बनवला तर लढाई निम्मी जिंकल्यासारखी आहे तर विरोधक एकदिलाने सामोरे गेले तर भाजपचे सहजी पानिपत होऊ शकते असे काही जणांना वाटते. थोडक्यात काय तर विरोधकांची नामशेष होण्याची वेळ आली असताना परत पुढचा डाव मांडला जात आहे. ‘थांबला तो संपला’.

काँग्रेसचा झालेला पराभव ही विरोधकांकरता इष्टापत्तीच आहे कारण अशा परिस्थितीतच  स्वत:चा बडेजाव न मारता तो पक्ष पुढील युद्धात सामील होईल. भाजपच्या पाडावाकरता कोणत्याही त्यागाला तयार राहील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. काँग्रेस गेल्यावेळी या तीन राज्यात जिंकल्याने बेसावध झाली आणि म्हणूनच लोकसभा निवडणूकीत ती हरली. 2003 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजप तिन्ही राज्यात विजयी झाली खरी पण सोनिया गांधींनी शिताफीने विरोधकांना एकत्र आणून भाजपाला 2004 साली केंद्रातून खाली खेचले होते हा ताजा इतिहास आहे. आता तीन राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा झालेला विजय म्हणजे काँग्रेसचा पराभव नाही कारण काँग्रेसला चार राज्यात एकूण मते भाजपपेक्षा जास्त पडलेली आहेत. असा युक्तिवाददेखील केला जात आहे. काँग्रेसकडे अजूनही 40 टक्के मत आहे हे या तीन राज्यात त्याने दिलेल्या कडव्या झुंजीने सिद्ध झाले आहे असा काही जाणकारांचा दावा असून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक हे मोठ्या प्रमाणावर काँग्रेसला मत देतात हे त्यातून दिसून आले आहे असे ते सांगत आहेत.

या दाव्याचा अर्थ असा की सवर्ण आणि मागासवर्गीय समाजात काँग्रेसने जर आपले स्थान बऱ्यापैकी बनवले पाहिजे.

भाजप हा एक साधा पक्ष राहिलेला नाही तर मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्याचे एक फार जबर असे ‘इलेक्शन मशीन’ बनवलेले आहे. या मशिनकडे साधनांची अजिबात कमतरता नाही आणि दूरगामी लाभासाठी दुप्पट पैसे खर्च करण्याचे धाडस तो करतो. एक ताजे उदाहरण बघायचे झाले तर मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री मोहन यादव यांचा जेव्हा शपथविधी झाला तेव्हा बिहारच्या यादवबाहुल भागांमध्ये मोठमोठे टीवी सेट्स लावून तेथील जनतेला ते दाखवण्याचे काम भाजपने अजब चतुराई आणि चपळाईने केले. लालू यादव यांच्या बिहारवरील राजकीय प्रभावाला सुरुंग लावण्यासाठी भाजप कसा बारकाईने काम करत आहे हे त्यावरून लक्षात येते. आजघडीला बिहार हे भाजपकरता सर्वात आव्हानात्मक राज्य झालेले आहे. तळागाळात फारसा बोभाटा न करता विरोधी पक्षांनी काम केले पाहिजे असाच याचा अर्थ होय. सत्तेत असल्याने तिचा दुरुपयोग करून भाजप आपलेच नॅरेटिव्ह पसरवण्यात यशस्वी होतो त्याला तोड शोधली पाहिजे, असं सूर विरोधी पक्षात बळावत आहे. कोणत्याही निवडणुकीत भाजप जिंको अथवा हारो, मोदी-शहा यांच्या मेहनतीत अजिबात कमी येत नाही. ज्यादिवशी पराभव होतो त्या राज्यात ते त्या दिवसापासूनच कामाला लागतात हे वाखणण्यासारखे आहे.  विरोधी पक्षांनी त्यातून धडा शिकला पाहिजे असेही सांगितले जात आहे. जोपर्यंत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन निवडणुकीत आहे तोवर लोकसभेत विरोधी पक्ष कधीही विजयी होऊ शकत नाही असे दावेदेखील वाढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान जिंकल्याने स्थानिक पातळीवरील प्रभावी नेत्यांना किनारी लावण्याचे काम परत जोरदारपणे सुरु झाले आहे. भाजपच्या अंतर्गत जे वेगळे राजकारण सुरु झाले आहे ते पुढील काळात काय वळण घेणार यावर मोदी-शहा यांचा जलवा कसा राहणार हे ठरणार आहे. शिवराज सिंग चौहान आणि वसुंधरा राजे यांना ज्याप्रकारे निष्प्रभ केले गेले आहे त्याचे परिणाम काय होणार याबाबत उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

‘मी मरण पत्करेन पण कोणत्याही पदाकरिता भीक मागणार नाही’ असे सांगून  शिवराज हे पक्षातील एक पॉवर सेन्टर बनले आहेत. ते स्वत:ला मोदींचे भक्तशिरोमणी म्हणून वरकरणी भासवतात खरे पण ‘मामा हे वेगळेच प्रकरण आहे’ हे पक्षातील सारेजण जाणतात. गेल्याच वर्षी त्यांना आणि नितीन गडकरींना पक्षाच्या केंद्रीय निवडणूक बोर्डमधून काढत मोदी-शहा यांनी त्यांना निवृत्त करण्याचा बेतच जाहीर केला होता. मध्यप्रदेशमधील देदिप्यमान विजयाने चौहान यांची राज्यावरील पकड स्पष्ट झाली आहे. 64 वर्षाच्या शिवराजांना एकेकाळी पंतप्रधानपदाकरताचा संभाव्य उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांनीदेखील भलावण केली होती. मोदी-शहा यांच्याबाजूने सर्व काही दाने पडत असताना गेल्या आठवड्यात संसदेत जी घुसखोरी झाली त्याने एक अजब संकट उत्पन्न केले आहे.

ज्या सरकारला संसद भवनाचे साधे रक्षण करता येत नाही तो देशाचे रक्षण काय करणार असा युक्तिवाद सुरु करून भाजपला विरोधी पक्षांनी मोठे अडचणीत आणलेले आहे. झाल्या प्रकाराबाबत अजून अवाक्षर न काढून पंतप्रधानांनी सत्ताधाऱ्यांची झालेली कोंडी अप्रत्यक्षपणे मान्य केली आहे. जे संसदेमध्ये झालेल्या घुसखोरीची चर्चा करायला कचरतात ते चीनच्या घुसखोरीबाबत मूग गिळून गप्पच राहणार, असे आरोप होत आहेत. या घटनेमुळे भाजपचे सारे कमावलेले पुण्य वाहून जाण्याची भीती निर्माण झालेली आहे. शेवटच्या तीन-चार महिन्यात जे मुद्दे पुढे येतात ते निवडणुकीत प्रभावी राहतात, असे मानले जाते. थोडक्यात काय तर पाच राज्यातील निवडणूका म्हणजे लोकसभेची सेमी फायनल असे मानले तर भारतीय राजकारणात जे सेमी फायनल जिंकतात ते नेहमी फायनल जिंकतात असे नसल्याने 2024 चा सामना अजून खुला आहे. घोडामैदान जवळच आहे.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article