कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजपच्या स्वबळाच्या नाऱ्याने महायुतीत धुसफुस

06:56 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिल्लीत नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भाजपकडून शिंदेंच्या शिवसेना गटाला कडेला लावण्यात येत असल्याची रणनिती आखली जात आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाण्यातच शिंदेंना घेरण्याची तयारी करत असताना, शिंदेंनी थेट दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीत राजकीय चर्चांबरोबरच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भाजप विरोधातील तक्रारींचा पाढा वाचला असून या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

Advertisement

Advertisement

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिवाळी सणाच्या निमित्ताने पत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना 2029 पर्यंत मुख्यमंत्री मीच असणार व आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही मुंबईत महायुतीत तर ठाणे, पिंपरी-चिंचवड व पुणे येथे भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर महायुतीत अस्वस्थता निर्माण झाली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपला यापुढे कोणत्याच निवडणुकीत इतर पक्षांच्या कुबड्या घेऊन राजकारण करायचे नसल्याचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे, महायुतीतील भाजप व शिवसेनेत चांगलीच धुसफुस सुरू झालेली असली तरी, राज्यात खरी लढाई ही महायुतीतील दोन घटक पक्ष विरूध्द भाजप अशीच असणार आहे. पुण्यात भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ विरूध्द शिवसेनेचे रवींद्र धंगेकर तर नवी मुंबईत गणेश नाईक विरूध्द शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांच्यात निर्वाणीची भाषा होताना दिसत आहे.

ठाण्यातील बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांसाठी भाजपने शिवसेनेला बाजुला सारत अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी युती केली आहे. भाजप नेहमीप्रमाणे निवडणुकीत साम दाम दंड भेद या सगळ्या नितीचा पुरेपूर वापर करते. भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा जिह्यात बोलताना भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचं बटन दाबलं तर सत्यानाश होईल, जर कुणी बंडखोरी केलीच तर मोठ्या नेत्यांचे दरवाजे पाच वर्षांसाठी बंद होतील असा इशारा देताना भंडाऱ्यातील सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असल्याचे खळबळजनक वक्तव्यही बावनकुळे यांनी केले. बावनकुळे यांच्या या वक्तव्याने राज्यात ज्यांना मेसेज जायचा तो मेसेज गेला आहे, भाजप राज्यात आपली ताकद वाढविण्यासाठी कोणताही धर्म पाळणार नाही. भाजपला जेव्हा शिंदेची गरज होती तेव्हा भाजपने त्यांचा वापर कऊन त्यांना त्यांचा राजकीय मोबदला सुध्दा दिला. महायुतीतील धुसफुस ही स्थानिक पातळीवर वाढत आहे, भाजपने शिवसेना शिंदे गटातील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील स्थानिक पातळीवरील नेत्यांना गळाला लावण्यास सुरूवात केली आहे. भाजपमध्ये इनकमिंग वाढत असताना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटात होणाऱ्या पक्षप्रवेशाला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. येत्या काळात भाजपकडून या दोन पक्षांना ऑपरेशन लोटसच्या नावाने लॉटमध्ये धक्का देऊ शकते, गेल्या पाच वर्षापासून स्थानिक पातळीवर कोणत्याच निवडणुका झालेल्या नाहीत. इच्छुकांची आणि उत्सुकांची संख्या वाढली आहे, त्यातच शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये फुट पडल्याने मोठी राजकीय स्पर्धा निर्माण झाली आहे. यापूर्वी केवळ युती आणि आघाडी पुरती असणारी ही स्पर्धा आता, खरा पक्ष कोणाचा खरे चिन्ह कोणाचे इथपर्यंत येऊन पोहचली आहे. आमदारकीच्या निवडणुकीला खासदार राहिलेल्या संजय निरूपम आणि मिलिंद देवरा सारख्यांना उतरावे लागले होते. मुंबई काँग्रेसला भरभराटीचे दिवस असताना या दोन नेत्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद भुषवले, मुंबईतून लोकसभेवर निवडून गेले, मात्र आमदारीच्या निवडणुकीला या दोन्ही नेत्यांना आमदारांकडून पराभव पत्करावा लागला. आता महापालिकेला आमदार राहिलेले उमेदवार उतरू शकतात, गेल्या महापालिकेत भाजपकडून अतुल शहा आणि शिवसेनेकडून विशाखा राऊत या दोन माजी आमदारांनी महापालिकेत प्रवेश केला होता. यातील अतुल शहा आणि सुरेंद्र बागलकर यांच्यात सामना टाय झाल्याने ईश्वर चिठ्ठीच्या पर्यायामुळे शहा हे महापालिकेत पोहचले. यावेळी राजकीय स्पर्धा तीव्र आहे, भाजपने राज्यात सर्वत्र स्थानिक पातळीवर प्रभाव असणाऱ्या नेत्यांना सोबत घेऊन सगळीकडे आपली ताकद वाढवली आहे, जिथे ताकद नाही तिथे इतर पक्षांचे नेते गळाला लावण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे भाजप हा सक्षम पर्याय इच्छुकांना दिसत असल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील इच्छुक आणि उत्सुक हे भाजपात केव्हाही प्रवेश कऊ शकतात आणि हीच मोठी चिंता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना लागून राहिली आहे. भाजपने अलीकडच्या काळात अनेक राज्यांमध्ये आपल्या मित्रपक्षांना हळूहळू राजकीयदृष्ट्या संपवण्याची रणनीती अवलंबल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. महाराष्ट्रातही तेच धोरण राबवले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांचा पक्ष आणि चिन्ह याबरोबरच दोन्ही नेत्यांचे राजकीय भवितव्य देखील भाजपवरच अवलंबून आहे. त्यामुळे आगामी काळात या दोन्ही पक्षांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या मुद्यांना व्यवस्थित हाताळताना देवाभाऊ म्हणून स्वत:ला प्रस्थापित केले, ते पण अजित पवार आणि एकनाथ शिंदेंसारख्या मराठा नेत्यांना बाजुला ठेवत. देवेंद्र फडणवीस हे कोणताही निर्णय घेतल्यावर त्या निर्णयावर ठाम राहतात, मात्र मराठी भाषेच्या निर्णयावर ठाकरे बंधू एकत्र आल्यावर फडणवीसांनी आदेश रद्द केला. आता मतचोरीच्या मुद्यावर ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या शनिवारी मतचोरी विरोधात विरोधीपक्षाने जो मोर्चा आयोजित केला आहे, त्याला कसा प्रतिसाद मिळतोय, या मोर्चात ठाकरे बंधू आणि शरद पवार हे तीनही महत्त्वाचे नेते एकत्र सहभागी होणार असल्याने, राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article