For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा घेराव तर सरकारकडून अटकाव

01:10 PM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपचा घेराव तर सरकारकडून अटकाव
Advertisement

नेते-शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात : रॅली रोखल्याने घोषणाबाजी : शेतकरी-भाजप कार्यकर्त्यांची सभा

Advertisement

बेळगाव : काँग्रेस सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांसोबत सुवर्णविधानसौधला घेराव घालण्यासाठी जाणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विरोधी पक्षनेते आर. अशोक व भाजप नेत्यांना पोलिसांनी हलगा गावानजीकच ताब्यात घेतले. मंगळवारी येडियुराप्पा रोडपासून सुवर्णविधानसौधकडे शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांनी काढलेली रॅली पोलिसांनी रोखल्याने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

भ्रष्ट सरकारच्या विरोधात आंदोलन :  विजयेंद्र 

Advertisement

सुवर्णविधानसौधला घेराव घालण्यास जाण्यापूर्वी येडियुराप्पा रोडवर शेतकरी व भाजप कार्यकर्त्यांची सभा झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र म्हणाले, राज्यातील भ्रष्ट सरकारच्याविरोधात आजचे हे आंदोलन आहे. शेतकरी व भाजपतर्फे विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. मात्र एकाही मंत्र्याने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली नाही. पीक नुकसान किंवा घरे कोसळल्यास तत्कालिन मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पाच लाख रुपयांची मदत दिली होती. सिद्धरामय्यांचे सरकार येऊन दोन वर्षे झाली आहेत. मात्र, शेतकऱ्यांसाठी एकही नवीन योजना घोषित केली नाही. आजपर्यंत अडीच हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यात यापूर्वी उसाच्या दरासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले. पण एकाही मंत्र्याने विचारपूस केली नाही. अहोरात्र करण्यात आलेल्या आंदोलनात मी स्वत: सहभाग घेतला. ऊस उत्पादनात कर्नाटक राज्य देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. काँग्रेस सरकार हे शेतकरीविरोधी आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपण पाच वर्षे पूर्ण करू, असे सांगतात. मात्र, त्यांच्यात खुर्चीसाठी अंतर्गत वाद सुरू आहेत. राज्यात कोठेही शेतकऱ्यांचे आंदोलन असो, त्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप त्यांच्या पाठीशी राहील. शेतकरीविरोधी सरकारला योग्य धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले.

चार कोटी शेतकऱ्यांचा विचार करा : सी. टी. रवी

यावेळी विधान परिषद सदस्य सी. टी. रवी म्हणाले, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये आंदोलने करण्यात आली आहेत. आजचा घेराव कार्यक्रम शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये उसाला चांगला भाव मिळत आहे. पण कर्नाटकात नाही. या ठिकाणी केवळ आमदार खरेदी केंद्र सुरू आहेत. पण रयत केंद्र सुरू करण्यात आलेली नाहीत. राज्यात वन्यप्राण्यांचा त्रास वाढला आहे. बळी पडलेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. देशात शेतकरी आत्महत्या करण्यात कर्नाटकाचा दुसरा क्रमांक आहे. खोटी नाटके बंद करा व शेतकऱ्यांना न्याय द्या, नवीन वीजजोडणी व ट्रान्स्फॉर्मरसाठी भरमसाट पैसे शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. युरियासाठी केंद्र सरकार सबसिडी देत आहे. सरकारने साखर कारखानदारांचा विचार न करता राज्यातील चार कोटी शेतकऱ्यांचा विचार करावा.

शेतकऱ्यांना न्याय मिळावा :  आर. अशोक

विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, उत्तर कर्नाटकचा विकास व्हावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी बेळगावात सुवर्णविधानसौध बांधण्यात आले आहे. मात्र, सरकारला याचा विसर पडला आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. आत्महत्या करण्यामागचे कारण काय? याची जाणीव सरकारला आहे की नाही? सरकारकडून पीक हमीभाव केंद्रे सुरू केली जात नाहीत. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये जमा केले जातात. यापूर्वी दहा हजार रुपयेही दिले जात होते. मात्र, राज्य सरकारकडून देण्यात येणारे चार हजार रुपये बंद करण्यात आले आहेत. भाजपकाळात अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झाल्यास पाच लाख रुपये भरपाई दिली जात होती. मात्र, आता केवळ 95 हजार रुपये दिले जात आहेत. सध्याचे सरकार आम्ही दोन हजार व बसमोफत देत आहोत, असे सांगत आहे.

राज्यातील काही मंत्री हरवले आहेत. ‘खजाना खाली खाली आणि सरकार जाली जाली’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे. हे सरकार मृत झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये खुर्चीसाठी चढाओढ सुरू आहे. अशा सरकारला खाली खेचले पाहिजे, असे ते म्हणाले. व्यासपीठावरील विविध मान्यवरांनी विचार व्यक्त केल्यानंतर शेतकरी व भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुवर्णविधानसौधकडे कूच केली. मात्र, हलगानजीक पोलिसांनी मोर्चाला रोखून सर्वांना ताब्यात घेतले. त्यावेळी काहीवेळ पोलीस व मोर्चेकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.