For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा सेफ गेम तर आघाडीत बिघाडी कायम

06:27 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
भाजपचा सेफ गेम तर आघाडीत बिघाडी कायम
Advertisement

राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून भाजपने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत जागावाटपामध्ये आघाडी घेतली. मात्र महाविकास आघाडीत अद्यापही जागावाटपाचा तिढा कायम असून, काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात काही जागांवऊन वाद आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील मतभेद भर पत्रकारपरिषदेतून समोर आले होते. त्यातच, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा काँग्रेसमध्ये सुरू झाली असून शिवसेना ठाकरे गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. 288 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी सुरू असल्याची राजकीय चर्चा रंगल्याने, महाविकास आघाडीत मात्र संभ्रम निर्माण झाला आहे.

Advertisement

राज्यात खऱ्या अर्थाने सर्वच पक्ष आता मैदानात उतरले आहेत. महायुतीतील भाजपने तर 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना जागावाटपात आघाडी घेतली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत मात्र अद्यापही सुंदोपसुंदी कायम आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जे यश मिळाले ते तीन पक्षांची ताकद एकत्र आल्याने, मात्र लोकसभेच्या निकालानंतर हुरळुन गेलेल्या शिवसेना आणि काँग्रेसला आता मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडू लागल्याने आघाडीत रोज एक नवीन वाद होत आहे. राष्ट्रीय पक्ष आणि त्या राज्यातील प्रादेशिक पक्ष ह्यांच्यात नेहमीच मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण हा वाद विधानसभा निवडणुकीला समोर येतो. लोकसभेला मात्र राष्ट्रीय पक्ष हाच त्या राज्यातील मोठा भाऊ असतो. मात्र आता पुन्हा एकदा हा वाद समोर आला आहे तो महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण यावऊन. उध्दव ठाकरे यांनी 2019च्या विधानसभेनंतर भाजपसोबत युती तोडली ती मुख्यमंत्री पदाबाबत भाजपने दिलेल्या आश्वासनामुळे असे ते जाहीर सांगतात, त्याचमुळे उध्दव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार हा सवाल उपस्थित केला. 1995 मध्ये युतीचे सरकार आले तेव्हाही शिवसेनेलाच अधिक जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेचा मुख्यमंत्री बाळासाहेबांनी भाजपकडून जास्त जागा घेऊन भाजपपेक्षा जास्त जागा निवडून आणत बनवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री बनायचे असेल तर जास्त जागा निवडून आणण्यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. महायुतीत आज एकनाथ शिंदे हे भाजपकडून अधिक जागा कशा मिळतील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत, त्यांनी अमित शहा यांच्याकडे 90 जागांची मागणी केली आहे, मात्र भाजप देणार का? हे माहीत नाही. लोकसभा निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचा भाजपला किती फायदा झाला हे माहीत नाही, मात्र काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा झाल्यानेच ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून काँग्रेसवर दबाव टाकण्यास सुरूवात केली. मात्र काँग्रेसने देखील ठाकरेंच्या दबावाला भिक घातली नाही, लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तो आघाडीतील समन्वयामुळे ज्या पक्षाची जेथे ताकद आहे, त्या ठिकाणी त्या पक्षाने दिलेले उमेदवार सरस ठरले. आता मात्र विदर्भात शिवसेनेची ताकद नसताना काँग्रेसच्या जागांवर शिवसेना दावा सांगत आहे, लोकसभेला शिवसेनेने अमरावती आणि रामटेक या जागा काँग्रेसला सोडल्याचे शिवसेना सांगत आहे, तर सांगलीत शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी करत निवडणूक जिंकली. आता याच लोकसभेच्या निकालाचा कित्ता गिरवत महाविकास आघाडीत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वत: मुख्यमंत्री होणार असल्याचे घोषित कऊन टाकले तर दुसरीकडे संजय राऊत यांनी काँग्रेसने स्वबळावर लढून दाखवा असे आव्हान दिले, काँग्रेस किंवा शिवसेना दोन्ही पक्ष जरी स्वबळावर लढले तरी त्यांची ताकद वाढणार नाही. आज भाजप वगळता 288 उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहेत का? हा मोठा प्रश्न आहे.

शरद पवारांनी 10 जागा लढविताना 8 जागा निवडून आणल्या तर एकनाथ शिंदे यांनी देखील आपला स्ट्राईक रेट लोकसभेत चांगला ठेवला. एकनाथ शिंदेंच्या ज्या तीन उमेदवारांची भाजपने सर्व्हेच्या नावावर लोकसभेची उमेदवारी कापली, त्या भावना गवळी, कृपाल तुमाणे आणि हेमंत पाटील यांचे शिंदे यांनी चार महिन्यातच विधानपरिषदेवर पाठवत राजकीय पुनर्वसन केले, मात्र इतर पक्षात विधानपरिषद किंवा राज्यसभा उमेदवारीची वेळ येते तेव्हा तिसरेच नाव अचानक समोर येते. भाजपने काल 99 उमेदवारांची यादी जाहीर करताना शिवसेनेकडे असलेल्या काही जागांवर उमेदवार घोषित केले, मात्र याबाबत एकनाथ शिंदे यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता, ज्या जागा वाट्याला येतील त्यातील अधिकाधिक कशा निवडून आणता येतील यासाठी प्रयत्न करा असा संदेश कार्यकर्त्यांना दिला आहे. भाजपने कमी जागा असताना एकनाथ शिंदे यांना दिलेले मुख्यमंत्रीपद हा जो त्याग भाजपने केला, त्या त्यागाची आठवण आता शिंदेंना कऊन देण्यास सुरूवात केली आहे. लोकसभेला ज्या प्रमाणे भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करताना शिवसेनेचे उमेदवार शेवटच्या क्षणी जाहीर केले, त्याचा फटका नाशिकच्या जागेवर शिवसेनेला बसला. भाजपची राज्यातील दुसरी तिसरी यादी आली तरी शिंदेंच्या उमेदवारांची घोषणा झाली नव्हती, तर डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरात केली होती. 2019 ला 165 जागा लढवत 105 जागा जिंकलेल्या भाजपची, लोकसभा निवडणुकीत कोकणात ताकद वाढली आहे, त्यामुळे भाजपची खरी मदार ही मुंबई, ठाणे आणि कोकणावर आहे. 99 उमेदवारांच्या यादीत भाजपने मुंबई आणि ठाणे-पालघरमधील उमेदवार जाहीर करताना पुन्हा त्याच उमेदवारांना संधी देताना कोणतीही रिस्क घेतलेली नाही. नालासोपारा, उरण या शिवसेनेकडे असलेल्या पारंपारिक जागांवर भाजपने उमेदवार दिले, मात्र जिथे नाराजी होऊ शकते त्या अपक्ष आमदार असलेल्या मिरा-भाईंदरच्या जागेबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही. भाजपसोबत असलेला मित्रपक्ष शिवसंग्राम या पक्षासाठी वर्सोवा विधानसभेची जागा सोडली जात होती, भारती लव्हेकर या भाजपच्या चिन्हावर दोन टर्म निवडणूक लढल्या मात्र कालच्या यादीत लव्हेकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही. त्याचबरोबर नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील भाजपने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही. एकंदरीतच भाजपने पहिली 99 उमेदवारांची घोषणा करताना सेफ गेम खेळत पक्षांर्तगत नाराजी वाढणार नाही याची पुरेपुर काळजी घेतली आहे.

Advertisement

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.