पाहुण्याच्या काठीने विंचु मारण्याची भाजपची भूमिका
भाजपने मुंबईत आपल्या सर्व बंडोबांना थंड केले असून, गोपाळ शेट्टी यांनी माघार घेतली तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलासाठी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घेतली नाही. भाजपने अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. भाजपची मुंबईतील भूमिका ही पाहुण्याच्या काठीने विंचु मारण्याची भूमिका घेतली असून विंचु मेला तर उत्तमच, पण तो न मरता नुसती काठी तुटली तर काठी पाहुण्याची होती, त्यामुळे माहीम विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या भूमिकेचा परिणाम महायुतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 30 ऑक्टोबर होती, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ही 4 नोव्हेंबर होती, यामध्ये पाच दिवसांची मुदत असताना देखील सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी पुन्हा एकदा गोंधळ पहायला मिळाला. त्यामुळे युती आघाडीतील मित्रपक्षांमध्ये सुरू असलेली शह काटशहची लढाई ही शेवटपर्यंत कायम राहणार असल्याचे आज तरी दिसत आहे. महायुती आणि आघाडीतील अनेक बंडखोरांनी आपली तलवार म्यान केलेली असली तरी हे बंडखोर युती धर्माचे पालन करणार का? हा मोठा सवाल आहे. मुंबईतील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेलं बंड म्हणजे भाजपचा राज्यातील सगळ्यात सुरक्षित मतदारसंघ बोरीवली विधानसभा, या मतदार संघातून भाजपचा उत्तर मुंबई चेहरा म्हणून बघितले जाते, त्याच गोपाळ शेट्टी यांनी केलेले बंड, मात्र सोमवारी भाजप नेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर शेट्टी यांनी मागे घेतले. विशेष म्हणजे 2019 ला याच विनोद तावडे यांचे बोरीवली विधानसभा मतदार संघातून भाजपने तिकीट कापले होते, त्याच तावडेंची शिष्ठाई भाजपच्या कामी आली. मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते, ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे मनसेच्यावतीने पहिल्यांदा निवडणूक लढवित आहेत. तर शिवसेना शिंदे गटाने येथून तीन टर्म आमदार असलेल्या सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली आहे. सरवणकर यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी भाजपने त्यांना आवाहन केले, मात्र सरवणकर यांनी वेगवेगळी राजकीय विश्लेषण करत भाजपला आव्हान दिले. जर मी माघार घेतली तर पहिल्यांदा माहीम, दादर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात धनुष्यबाण हे चिन्ह नसणार असे सरवणकर म्हणाले. मनसेने निवडणूक पूर्वयुती करायला हवी होती, काही सोयीच्या जागांवर तडजोड करता येणार नसल्याने सरवणकर यांनी सांगताना आपण लोकांमध्ये असल्याने सतत निवडून येत असल्याचे सांगितले.
धनुष्यबाण या चिन्हाचा विचार करता ही निवडणूक काही मतदारसंघात चिन्हाच्या दुष्टीने महत्त्वाची असणार आहे, विशेषत: ठाकरे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ठाणे वगळता तळ कोकणापर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणत्याच मतदारसंघात उमेदवारी दिली नाही. नारायण राणे, सुनिल तटकरे, कपिल पाटील, डॉ. हेमंत सावरा यांना भाजप आणि राष्ट्रवादीने उमेदवारी दिली.(अपवाद ठाण्यातून राजन विचारे आणि कल्याणमधून वैशाली दरेकर यांचा) ज्या कोकणात शिवसेना वाढली, कोकणातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार असायचे मात्र, शिवसेना म्हणजेच कोकण असे समीकरण असणाऱ्या तळ कोकणात आज शिवसेनेचा एक ही खासदार नाही. गेल्या निवडणुकीत धनुष्यबाणच कोकणातून गायब झाले, हे पहिल्यांदा घडले. मुंबईतील माहीम, शिवडी आणि वरळी, वडाळा हे शिवसेनेचे बालेकिल्ले समजले जातात, या चार पैकी तीन मतदारसंघात 2019 ला शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते. आता मात्र वरळी आणि माहिम येथून शिंदे यांची शिवसेना विऊध्द ठाकरे शिवसेना यांच्यात सामना होत आहे, तर शिवडी येथे महायुतीने उमेदवार न देता मनसे उमेदवार बाळा नांदगांवकर यांना पाठिंबा दिला आहे, मनसेला अशीच लढत माहीममध्ये हवी होती,
शिवसेना शिंदे गट आणि भाजपचा पाठिंबा घेत लढायचे मात्र निवडणूकपूर्व युती न करता लढायचे, शिवसेनेच्या बालेकिल्य्यात दोन्ही शिवसेनेपेक्षा तिसरा पर्याय लोकांना द्यायचा, भाजप यातून एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करत आहे. एक तर उध्दव ठाकरेंना त्यांच्याच बालेकिल्यात शह देता येतो, दुसरं शिंदे यांचे संख्याबळ कमी होणार आहे, जे आगामी काळात मुख्यमंत्री पदासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. (मनसेचे संख्याबळ वाढले तरी ते भाजपला पाठिंबा देणार आहे) आणि तिसरे मनसेचे 2009 सारखे मुंबईत संख्याबळ वाढवून मनसेचे अस्तित्व कायम ठेवायचे आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांना मुंबईत सर्वाधिक यश मिळाले, मुंबईत आवाज उध्दव ठाकरे यांचाच असल्याची सर्वत्र चर्चा झाली. आता तोच आवाच बदलण्यासाठी महायुती प्रयत्न करत आहे. वांद्रे (पूर्व) येथून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार वरूण सरदेसाई यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे झिशान सिद्दीकी उमेदवार असताना, अपक्ष उमेदवार कृणाल सरमळकर जे शिंदे गटाचे आहेत, त्यांनी आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. मुंबईत मातोश्रीच्या अंगणातील आणि मराठी माणसाचा बालेकिल्ला असणारी दादर-लालबाग परिसरातील लढाई ही शिवसेनेसाठी महत्त्वाची मानली जाते.
आगामी विधानसभा निवडणूक ही मुंबई महापालिकेची लिटमस टेस्ट असल्याने, शिवसेना ठाकरे गटाला याच निवडणुकीत शह दिला तर महापालिका निवडणुकीत मुंबईवर वर्चस्व सिध्द करणे सोपे जाणार आहे. भाजपने मुंबईत स्वत:च्या 18 जागा घेतल्या असून एक जागा मित्रपक्ष आरपीआयला देताना उमेदवार मात्र भाजपचा दिला आहे, तर शिवसेना शिंदे गटातील जागांवर शायना एनसी, मुरजी पटेल हे मूळ भाजपचे उमेदवार शिंदे यांच्या धनुष्यबाण चिन्हावर लढत आहेत. म्हणजेच भाजप एकीकडे राज ठाकरे यांना जवळ करताना, दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे यांना शह देण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. माहीम विधानसभा मतदार संघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी आपला निवडणूक लढविण्याचा निर्धार कायम ठेवल्याने महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. सरवणकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे