भाजपचा जाहीरनामा हीच मोदींची गॅरंटी
प्रतिनिधी/ बेंगळूर
पुढील पाच वर्षांसाठी या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. आमचा आजचा जाहीरनामा मोदींची गॅरंटी आहे. देशभरात तीन कोटी नवीन घरे बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक गरीबाला पुढील पाच वर्षे मोफत रेशन मिळेल. याचबरोबर 70 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान योजनेअंतर्गत मोफत उपचार दिले जात आहेत. या सर्व गॅरंटी राज्यातील लोकांपर्यंतही पोहोचतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या गृह मतदारसंघात असलेल्या म्हैसूरमध्ये मतयाचना केली. विजय संकल्प मेळाव्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हैसूर-कोडगू, चामराजनगर, मंड्या आणि हासन मतदारसंघातील उमेदवारांना आपले मत देऊन विजयी करण्याचे आवाहन केले. व्यासपीठावर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह चार मतदारसंघातील उमेदवार यदुवीर वडेयर, एस. बलराजू, एच. डी. कुमारस्वामी आणि प्रज्ज्वल रेवण्णा उपस्थित होते.
यापूर्वी भारत खराब रस्त्यांमुळे चर्चेत होता. आज ते एक्स्प्रेस वे, अंडरवॉटर-वे, एअरवेज म्हणून ओळखले जात आहे. भारत जगाचे संशोधन केंद्र बनणार आहे. भारत कमी खर्चात औषधे, ऑटोमोबाईल्स, सेमीकंडक्टर, यंत्रसामग्री तयार करेल. कलम 370, तिहेरी तलाक, राम मंदिर हा संकल्प पूर्ण झाला आहे. एनडीएकडून सर्व आश्वासनांची पूर्तता केली जात आहे. तुम्हा सर्वांच्या मतांमुळे मोदींच्या गॅरंटींना बळ मिळेल, असे त्यांनी सांगितले.
कर्नाटकात एनडीएकडे देवेगौडा यांची ताकद आहे. कुमारस्वामी यांचा अनुभव कर्नाटकच्या विकासासाठी आवश्यक आहे. सुत्तूर मठाची परंपरा, कुवेंपू एकतेचा संदेश आहेत. कर्नाटक वीर मार्शल करिअप्पा, कृष्णराज वडेयर यांचे जन्मस्थान आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
देशाला फोडणारे नेते काँग्रेसमध्ये आहेत. काश्मीर आणि भारताचे नाते काय, हे काँग्रेस नेते सांगतील. देश विभाजनाचे वक्तव्य केलेल्यांना काँग्रेसने तिकीट दिले आहे. भारत मातेचा जयजयकार करण्यास काँग्रेस नेते मागे हटत आहेत. भारत मातेचा जयजयकार करण्यासाठी परवानगी हवी असल्याचे ते म्हणतात. भारत मातेचा जप करायला परवानगी हवी का? अशा काँग्रेस नेत्यांना जनतेने कदापी माफ करू नये, असे आवाहनही पंतप्रधान मोदी यांनी केले.