अहिरवालमध्ये चालली भाजपची जादू
हरियाणातील अहिरवाल क्षेत्रात भाजपचे दिग्गज नेते राव इंद्रजीत सिंह यांचा करिष्मा दिसून आला. या क्षेत्रात यापूर्वी जवान, शेतकरी आणि पैलवान यांच्या नाराजीचा प्रभाव दिसून येत होता. विशेष म्हणजे याच भागात मोठ्या संख्येत जाट मतदार देखील आहेत. जाट मतदारांची नाराजी असूनही भाजपने या भागात मोठे यश मिळविले. राव इंद्रजीत आणि भाजपने या भागात बिगरजाट मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्यास यश मिळविले.अहिरवाल क्षेत्रात भाजपने यादव मतदारांवर लक्ष केंद्रीत केले होते. हरियाणात यादव मतदारांची संख्या सुमारे 12 टक्क्यांच्या आसपास आहे. या क्षेत्रात भाजपने राव इंद्रजीत सिंह यांना फ्री हँड दिला होता, याचा प्रभाव निकालात दिसून येत आहे. भाजपने येथेच काँग्रेसवर मोठी आघाडी घेतली आहे. केंद्रीय मंत्री राव इंद्रजीत सिंह यांनी येथे भाजपच्या सर्व उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला होता.
गटबाजीवर मिळविले नियंत्रण
विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपमध्ये गटबाजी असल्याचे बोलले जात होते, परंतु भाजपने मतदानापूर्वी येथील गटबाजीवर नियंत्रण मिळविले. याचा लाभ पक्षाला होताना दिसून येत आहे. सर्व वरिष्ठ नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येत उमेदवारांसाठी प्रचार केला होता.