जम्मूत सावरले भाजपचे घर !
काँग्रेसला मात्र करावा लागतोय संघर्ष
वृत्तसंस्था / जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक ऐन रंगात आली आहे. बुधवारी मतदानाचा द्वितीय टप्पा पार पडला आहे. या टप्प्यातही मतदानाची टक्केवारी मागच्या निवडणुकांच्या तुलनेत समाधानकारक राहिली. मतदानाचा आणखी एक टप्पा आता शिल्लक असून त्यानंतर निर्णयाचीच अपेक्षा राहणार आहे.
जम्मू विभाग हा हिंदुबहुल आहे. येथील बव्हंशी मतदारसंघांमध्ये हिंदूंची बहुसंख्या असून या भागातील 43 मतदारसंघांपैकी हिंदुबहुल मतदानसंघ 34 असल्याची महिती देण्यात आली आहे. या भागात प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष पारंपरिकदृष्ट्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस हेच आहेत. या 34 मतदारसंघांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमॉव्रेटिक पक्षाला फारसे स्थान नाही. या दोन प्रादेशिक पक्षांचा सगळा भर काश्मीर खोऱ्यातील मुस्लीमबहुल भागांवरच आहे.
भाजपचे बंडखोरीवर नियंत्रण
या विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली, तेव्हा, काँग्रेसला लाभदायक वातावरण आहे असे दिसून येत होते. भारतीय जनता पक्षाला अंतर्गत बंडाळीने ग्रासल्यामुळे हा पक्ष मोठा प्रभाव पाडू शकणार नाही, अशी अटकळ अनेक निवडणूक तज्ञांनी बांधली होती. काँग्रेसलाही बंडखोरीचा फटका बसलेला होता. पण तो भारतीय जनता पक्षाच्या तुलनेत कमी होता. जो पक्ष बंडखोरी नियंत्रणात आणेल, तोच या भागात प्रभावी ठरणार, हे स्पष्ट झालेले होते. मतदानाची वेळ जसजशी जवळ आली तसे भारतीय जनता पक्षाने आपले घर सावरले आणि बंडखोरीला यशस्वीरित्या आळा घातला. याचा लाभ या पक्षाला मिळण्याची शक्यता आता दिसून येत आहे. काँग्रेस मात्र मागे पडल्याचे दिसते.
भाजप इतिहास पुनरावृत्त करणार?
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला या भागात 25 जागा मिळाल्या होत्या. ही संख्या या पक्षाने या भागात जिंकलेल्या जागांपैकी सर्वाधिक होती. यावेळी या पक्षाने आपल्या जागा वाढविण्याचा निर्धार केला असून संख्या 30 ते 34 पर्यंत नेण्याची या पक्षाची महत्वाकांक्षा दिसून येते. तथापि, काँग्रेसच्या प्रचारात कमालीचा शिथीलपणा दिसून येतो. त्यामुळे हा पक्ष कोठेही स्पर्धेत असल्याचेही जाणवत नाही. मतदानाचे दोन टप्पे पार पडूनही अशी स्थिती आहे. त्यामुळे राजकीय अभ्यासकांमध्ये या पक्षाच्या कामगिरीवर चिंता केली जाते. कदाचित भारतीय जनता पक्ष यंदा येथे आपल्या 2014 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करेल, किंवा अधिक चांगली कामगिरी करेल, असे अनुमान तज्ञांचे आहे.
छांब आणि अखनूरमध्ये समस्या
यंदा काँग्रेसला आपला पारंपरिक बालेकिल्ला छांब आणि अखनूरमध्ये कठीण परिस्थितीशी झगडावे लागल्याचे दिसते. 1987 आणि 1996 या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेसने नेहमी या भागात यश मिळविले आहे. पण यंदा अखनूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा तर छांबमध्ये अपक्षाचा जोर दिसून येतो. छांबमध्येही प्रदेशाचे माजी उपमुख्यमंत्री मास्टर ताराचंद यांना दणका बसू शकतो. अखनूर हा मतदारसंघ आता आरक्षित झाल्याने काँग्रेसची कोंडी झाली आहे. छांबमध्ये काँग्रेसने ताराचंद यांच्यावरच विश्वास टाकला असला तरी त्यांना अपक्ष उमेदवार सतीश शर्मा हे एकेकाळचे काँग्रेसचेच नेते अपक्ष लढत आहेत. आर. एस. पुरा येथे काँग्रेसने तरणजीत सिंग तोनी यांना उतरविले असून त्यांच्या विरोधात पक्षात आणि मतदारांमध्ये मोठा असंतोष आहे. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या श्री माता वैष्णोदेवी मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारासंबंधीही बरेच आक्षेप आहेत. काँग्रेसवर जम्मूत खोलवर प्रचार न केल्याचा आरोप पक्षातूनच होत आहे. भारतीय जनता पक्षाने मात्र, ही त्रुटी ठेवलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अनेक ज्येष्ठ नेत्यांपर्यंत सर्वांनी जम्मूच्या आंतर्भागात जोरदार प्रचाराची लाट निर्माण केल्याचे पहावयास मिळते, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
कोण किती जागांवर?
विधानसभेच्या 90 जागा असून त्यांच्यापैकी काँग्रेस 32 लढवित आहे. या पक्षाची नॅशनल कॉन्फरन्सशी युती झाली असून तो पक्ष 51 जागांवर युतीत लढत आहे. पण ही युती पूर्णांशी नाही. कारण पाच मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. या जागा प्रामुख्याने काश्मीर खोऱ्यात आहेत. या युतीने प्रत्येकी एक जागा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणीत एम. वाय. तारीगामी गटाला आणि हर्षदेव सिंग यांच्या नॅशनल पँथर्स पक्षाला सोडली आहे. काँग्रेस जम्मू भागात चार मैत्रीपूर्ण लढतींसह 29 जागांवर लढत आहे. तर हा पक्ष खोरे भागात दोन मैत्रीपूर्ण लढतींसह 9 जागांवर नशीब आजमावत असल्याचे दिसून येते.