महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तिसऱ्या फेरीनंतर सावध भाजपचे हिंदू कार्ड

06:32 AM May 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘एक मोदी सब पे भारी’ अशा थाटात सुरु झालेल्या लोकसभा निवडणुकीत तीन फेऱ्या होता होताच सत्ताधारी पक्षाची अचानक दमछाक होताना दिसत आहे. स्वतंत्र भारतातील सर्वात मजबूत नेता अशी स्वत:ची प्रतिमा बनवू पाहणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घायकुतीला आल्यासारखे वाटत आहेत. परीक्षा जवळ येईपर्यंत फारसा अभ्यास न केलेला मुलगा पेपर पडहुन घामाघूम होतो तशा विद्यार्थ्यांसारखे मोदींचे वर्तन वाटत आहे. यात कितपत खरे अथवा खोटे ते येणारा काळ दाखवेल पण नेहमी प्रकाशझोतात राहणाऱ्या नेत्याची चलबिचल लोकांच्या नजरेतून फारशी लपून राहत नाही तेही तेवढेच खरे.

Advertisement

 

Advertisement

पंतप्रधान हा देश-विदेशात काय चालले आहे याबाबत अतिशय अद्ययावत माहिती बाळगणारा एकमेव नेता असतो. त्याला कोठे काय चालले आहे त्याबाबत माहिती सांगणारी मोठी यंत्रणा रात्रंदिवस काम करत असते की जेणेकरून सरकार अथवा सत्ताधारी पक्ष त्याचा ठामपणे मुकाबला कसा करावयाचा हे सत्वर ठरवू शकेल. सत्ताधारी पक्षाचा अध्यक्ष कोणीही असो पण संसदीय लोकशाहीत पंतप्रधानच महत्त्वाचा असतो आणि त्याच्या कलाने इतरांना घ्यावे लागते. स्वत:च्या दमावर पक्षाला निवडून आणणाऱ्या मोदींबाबत तर ते तंतोतंत खरे आहे.

अशावेळी गेल्या दहा वर्षात आपल्या सरकारने राज्यकारभारात काय काय विक्रम करून अटकेपार झेंडे कसे लावले असे दावे केले जातील आणि देशात आपल्या काळात दुधातुपाच्या नद्या कशा वाहिल्या लागल्या आहेत असे राज्यकर्ते सांगतील. तसेच जाहीरनाम्यात नव्यानव्या आणि लोकांना आकर्षित करणाऱ्या योजनांबाबत सांगितले जाईल अशी अपेक्षा केली जात होती. पंतप्रधानांच्या पासंगाला पोचणारा  एकही नेता विरोधकांकडे नाही असे सांगितले जाईल अशी अपेक्षा होती. पण ‘मंगळसूत्र’ असो अथवा काँग्रेसचा जाहीरनामा असो अथवा मुस्लिम समाजाची कथितपणे वाढत असलेली लोकसंख्या असो असे विषय घेऊन सारे हिंदू-मुस्लिम केले जात आहे.

पण पहिल्या फेरीनंतरच पंतप्रधानांचे सूर बदलू लागल्याने आणि तिसऱ्या फेरीनंतर त्यांनी आक्रमक हिंदुत्वाची कास धरल्याने ‘हे सारे चालले आहे तरी काय?’ असा सामान्य माणसाला प्रश्न पडला तर नवल नाही. उठसुठ विरोधी पक्ष आणि विशेषत: काँग्रेस मुस्लिम तुष्टीकरणाचे काम कसे करत आहे असा प्रचार शिगेला पोहचला आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात जे सांगितलेच नाही त्यावरून तो हिंदुविरोधी कसा आहे असे दावे केले जात आहेत.

देशात एव्हढी विद्वेषक निवडणूक पाहिली गेली नव्हती असे दावे केले जात आहेत. पंतप्रधानांच्या प्रचाराने एक खालची पातळी गाठली आहे असे आरोप होत आहेत. त्यांना आवर घाला अशा अर्जविनंत्या निवडणूक आयोगाकडे केल्या जात आहेत. आयोगाचा ज्या प्रकारे कारभार सध्या सुरु आहे त्याने तो फारसा सक्रिय आहे असे अजिबात दिसत नाही असा संदेश मात्र सर्वदूर गेलेला आहे. 19 एप्रिलपासून काँग्रेसने आयोगाकडे भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरुद्ध 59 तक्रारी नोंदवल्या आहेत पण काहीही केले गेलेले नाही असा त्याचा दावा आहे.

निवडणुकीची चौथी फेरी लवकरच होत असताना सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर करून भाजप आणि केंद्र सरकारला एक भला मोठा धक्का दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडताच केजरीवाल यांनी हुकूमशाही विरुद्ध आपला संघर्ष अजूनच तीव्र होणार आहे असे सांगून विरोधकांच्या प्रचारात अजून जान आणणे सुरु केले आहे. ही मुलुखमैदान तोफ मैदानात आल्याने विरोधकांच्या गोटात आनंदोत्सव सुरु झाला आहे. केजरीवाल हे केवळ दिल्ली आणि पंजाबमध्ये प्रचार करणार नसून सगळीकडे वणवा पसरवण्याचे काम करणार आहेत असे सांगितले जात आहे. येथील हनुमान मंदिरात बजरंग बलीचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ करून भाजपची पंचाईत केली आहे. हिंदुत्वावर देखील आपण भाजपशी दोन हात करणार याचे हे सुतोवाच आहे. केजरीवाल यांची ही सुटका म्हणजे ‘आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन’ असेच काहीसे झाले आहे. कारण तुरुंगात जाऊनदेखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देऊन केजरीवाल यांनी भाजपची रणनीतीच बिघडवली आहे.

निवडणुकीच्या या प्रचारात अदानी-अंबानी हे खोऱ्याने काळा पैसा काँग्रेस आणि राहुल गांधींना देत आहेत असा पंतप्रधानांनी अचानक केलेला आरोप देखील भाजपच्या विरोधात जाताना दिसत आहे. ही औद्योगिक घराणी धंदेवाली आहेत. कोणाला बिनकामाचा ते छदाम देखील देणार नाहीत. जर ते काँग्रेसला पैसे देत असतील तर ‘ज्याची सरशी, तिकडे पारशी’ हा न्याय लागू होतो. पंतप्रधानांच्या या आरोपाविषयी प्रसारमाध्यमांमध्ये फारशी प्रतिक्रिया दिसली नाही कारण बऱ्याच वृत्तवाहिन्यांची मालकी य दोन घराण्यांकडे आहे हे जगजाहीर आहे.

शितावरून भाताची परीक्षा होते असे मानले तर तीन राज्यात सुरु असलेली भाजपची घालमेल येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यापुढे वेगळेच मांडून ठेवले आहे काय याची शंका यावी. प्रचाराच्या या धामधुमीत भाजपला एक अपशकुन झाला आहे. त्याचे हरयाणातील सरकार अचानक अल्पमतात आलेले आहे. तीन अपक्ष आमदारांनी नवनिर्वाचित मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. कालपरवापर्यंत भाजपबरोबर सत्तेत भागीदार असलेले जनवादी जनता पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यन्त चौटाला यांनी सरकारला खाली खेचण्यासाठी काँग्रेसला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. सहा महिन्यात विधानसभा निवडणूका असल्याने काँग्रेसने ‘ठंडा करके खाओ’ धोरण अवलंबिले आहे. अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गेल्यावेळी राहुल गांधींचा पराभव करून एक विक्रम केला होता. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते किशोरी लाल शर्मा यांनी त्यांना सळो की पळो करून सोडले आहे. काँग्रेसतर्फे अमेठीची देखभाल गेली 30 वर्षे सांभाळणारे शर्मा म्हणतात बघा या वेळी ‘मी स्मृतीना कसे आस्मान दाखवतो’. गमतीची गोष्ट अशी की ज्या जोमाने काँग्रेस अमेठी आणि रायबरेलीची लढाई लढत आहे त्याने उत्तर प्रदेशात विरोधकांना खराच चैव आला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची राज्यावरील पकड कायम असल्याने भाजप आपल्याला फारसा धोका नाही असे मानते. राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मोदी-शहा यांनी बाजूला केले, त्याने राज्यामधील भाजपची गोची झाली. राजे या राज्यातील सर्वात लोकप्रिय नेत्या असल्या आणि त्या स्टार प्रचारकांच्या यादीत असल्या तरी आपल्या मुलाचा मतदारसंघ सोडून त्या कोठे बाहेरच पडल्या नाहीत. राज्यात किमान 6 ते 8 ठिकाणी काँग्रेसचा जोर झाला पण श्रेष्टी रागावतील या भीतीने राजेंना कोणी औपचारिकपणे प्रचारासाठीच बोलावले नाही. आता निकाल येईपर्यंत राजस्थानमध्ये शांतता असली तरी जर निकाल विपरीत लागले तर ती वादळापूर्वीची शांतता ठरेल. जर मोदी-शहाच निवडणूक जिंकवतात असा समज असेल तर त्यांनाच प्रचार करून दिलेला बरा असा अघोषित पवित्रा पक्षातील बऱ्याच जणांनी घेतल्याचे बोलले जाते. भाजपमधील एक गट मात्र मोदी हे एका ठराविक प्लॅनप्रमाणे काम करत असून त्यांना बहुमत मिळायला काहीही अडचण पडणार नाही असा दावा करत आहे. याचबरोबर संघ आणि भाजपमध्ये बेबनाव झाला आहे अशी वृत्ते म्हणजे फक्त वावड्या आहेत आणि मोदींच्या मागे नागपूर ठामपणे उभा आहे, असे सांगत आहे. येत्या आठवड्यात पंतप्रधान वाराणसीमधून आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत तेव्हा उत्तरप्रदेशातील भाजपच्या मोहिमेला अजून धार चढेल अशी अपेक्षा केली जात आहे. मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची खासियतच आहे की शेवटच्या चेंडूपर्यंत दमाने लढायचे. शरद पवारांनी राहुल यांची भलावण करून इंडिया आघाडीचे तेच पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत असा संकेत दिलेला आहे. राहुल यांनी पंतप्रधानांशी जाहीर वादविवाद करण्याची तयारी दाखवून चेंडू भाजपकडे टोलवला आहे. दिवसेंदिवस निवडणूक रोमहर्षक बनत आहे याचीच ही निशाणी होय.

सुनील गाताडे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article