For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानपरिषदेसाठी भाजपची सावध पावले

06:30 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
विधानपरिषदेसाठी भाजपची सावध पावले
Advertisement

लोकसभेच्या निवडणुकीत बसलेल्या धक्क्यानंतर आता भाजपकडून सावध पावले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या भाजपच्या वाट्यातील 5 जागांसाठी भाजपने सोमवारी यादी जाहीर केली. आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजपने पंकजा मुंडे यांना संधी देण्याचे ठरवले आहे. भाजपकडून मित्रपक्षांना सातत्याने डावलले जात असल्याने राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महायुतीला पाठिंबा देणारे मित्रपक्ष आज भाजपवर नाराज आहेत. प्रहारचे बच्चु कडू यांनी अमरावती लोकसभा निवडणुकीत उमेदवार देताना नवनीत राणा यांचा पराभव करण्यासाठी हातभार लावला, आता तर कडू यांनी विधानसभा स्वबळावर लढवण्याची भाषा केली आहे तर रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी वेळोवेळी आपली नाराजी व्यक्त करताना आम्ही काय फक्त बैलगाडीला वंगण घालायला बसलोय काय? असा सवाल करत भाजपवर टीका केली होती. त्यामुळे मित्रपक्षांना संधी म्हणून रयत क्रांती मोर्चाचे सदाभाऊ खोत यांनाही भाजपकडून संधी दिली गेली आहे. मात्र धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना या यादीत स्थान देण्यात आलेले नाही.

Advertisement

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सध्या मुंबईत होत आहे. महायुती सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असून या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 12 जुलैला विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी मतदान होणार आहे. या जागा विधानसभा सदस्यांमधून भरल्या जाणार आहेत. भाजपने आपल्या कोट्यातील 5 उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर करताना त्यात पंकजा मुंडेंसह, सदाभाऊ खोत आणि परिणय फुपेंच्या नावाचा समावेश केला आहे. बीड लोकसभा मतदार संघातून बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा समर्थक असलेला वंजारी समाज दुखावला गेला होता. गेल्या काही दिवसांत राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावऊन वातावरण तापले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाच्या नाराजीचा भाजपसह महायुतीला मोठा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांना देण्यात आलेली विधानपरिषेदची उमेदवारी महत्त्वाची मानली जात आहे. पंकजा मुंडे यांचा झालेला पराभव हा मुंडे यांचा पराभव नसून हा भाजपचा पराभव असल्याचे विश्लेषण भाजपच्या शिर्ष नेत्यांकडून करण्यात आल्यानंतर अखेर भाजपने पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला आहे. पंकजा मुंडे या कायद्याच्या सभागफहात असल्या पाहिजेत अशी मागणी ओबीसी नेत्यांकडून वारंवार केली जात होती. एकीकडे मराठा आरक्षणाचा भाजपला निवडणुकीत बसलेला फटका विशेषत: जालना आणि बीड या लोकसभा मतदार संघात भाजपचा पराभव बघता विधानपरिषदेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळणार अशी अटकळ बांधली जात असताना, अखेर भाजपने मुंडे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही, पंकजा मुंडे यांच्याबरोबरच सदाभाऊ खोत, परीणय फुके, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी दिली आहे. भाजपने यापूर्वी विधानपरिषद निवडणुकीत कमी मतदान असताना प्रसाद लाड यांना अतिरीक्त उमेदवारी देऊन काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव केला होता. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडीची विशेषत: काँग्रेसची मते फोडली होती, मात्र आता लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश बघता काँग्रेस काय महाआघाडीचीही मते फुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे भाजपने यावेळी कोणतीही रिस्क न घेता पाच उमेदवार जाहीर केले आहेत. लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने विधानसभेतील सात आमदारांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा तर अशोक चव्हाण आणि राजु पारवे या दोन आमदारांनी दिलेला राजीनामा आणि चार आमदारांचे निधन आणि काँग्रेस आमदार सुनिल केदार यांच्यावर केलेली अपात्रतेची कारवाई यामुळे विधानसभेची आमदारांची संख्या चौदाने कमी झाली आहे. विधानसभा आमदारांची संख्या कमी झाल्याने  विधानपरिषद निवडणुकीत मतांच्या कोट्यात घट झाली असून 23 किंवा 24 मतांचा कोटा हा विजयासाठी आवश्यक असणार आहे. सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेसचा एक उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडे स्वबळावर उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसे संख्याबळ नाही. पण दोघांची मते एकत्र केल्यास एक उमेदवार निवडून येऊ शकतो. शिंदे गटाकडे असलेले संख्याबळ बघता त्यांचे दोन उमेदवार तर अजित पवार गटाचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. 11 जागांसाठी जर भाजपने 5 अजित पवार गटाने, शिंदे शिवसेना 2 असे महायुतीचे 9 उमेदवार तर काँग्रेस-1, शिवसेना ठाकरे गट -1 आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 1 उमेदवार दिल्यास 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आल्यास या निवडणुकीची चुरस वाढणार असून मोठ्या प्रमाणात लक्ष्मी दर्शन आमदारांना शेवटच्या अधिवेशनात होऊ शकते. महाविकास आघाडीतून शेकापचे जयंत पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांनी या निवडणुकीत एंन्ट्री केल्यास मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होऊ शकतो. शेकापच्या जयंत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गिते यांना रायगडातील पेण, अलिबाग या शेकापच्या बालेकिल्यात मताधिक्य न केल्याने उध्दव ठाकरे हे नाराज असल्याची चर्चा आहे. अनंत गिते यांना रत्नागिरीतील दापोली आणि गुहागर या मतदार संघातच आघाडी मिळाल्याने ठाकरे हे जयंत पाटील यांना महाविकास आघाडीतून उमेदवारी देण्यासाठी अनुकुल नसल्याचे समजते. दोन वर्षापूर्वी ठाकरे सरकार गेल्यानंतर आलेल्या महायुती सरकारला पाठिंबा दिलेल्या प्रहारचे बच्चु कडू यांचे दोन आमदार, हितेंद्र ठाकुर यांच्या बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार आणि इतर अपक्ष आमदार यांनी जर आपली भूमिका बदलली आणि वेगळा निर्णय घेतल्यास चमत्कार होऊ शकतो. त्यातच लोकसभा निवडणुकीनंतर राज्याचे चित्र बदलले असून शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील आमदार शरद पवारांच्या तर शिंदे गटातील काही आमदार उध्दव ठाकरेंच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने होणार असल्याने या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानपरिषद निवडणुकीत चमत्कार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रवीण काळे

Advertisement

Advertisement
Tags :

.