भाजपच्या सभात्यागात अधिवेशनाचे सूप वाजले
विधिमंडळाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब : अर्थसंकल्पाला दोन्ही सभागृहांत मंजुरी
बेंगळूर : काँग्रेस नेते सय्यद नासीर हुसेन यांच्या समर्थकांनी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी देखील विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ माजला. ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिलेल्यांना 48 तासानंतरही अटक झालेली नाही. राज्य सरकार देशद्रोह्यांचे रक्षण करत आहे, असा आरोप करत भाजप आमदारांनी धरणे आंदोलन केले. त्यानंतर सरकारच्या भूमिकेचे खंडन करत सभात्याग केला. दरम्यान, या गदारोळात विधानसभेत 2024-25 सालातील अर्थसंकल्प संमत करण्यात आले. त्यानंतर सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी तहकूब करण्यात आले. गुरुवारी सकाळी विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या आमदारांनी पाकिस्ताच्या समर्थनार्थ घोषणा दिलेल्यांना अटक करावी, अशी मागणी करत धरणे आंदोलन सुरू केले. तसेच सरकारच्या विरोधात धिक्काराच्या घोषणा दिल्या. यावेळी अर्थसंकल्पावर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरसावले असता भाजप आणि निजद आमदारांनी ‘बोगस अर्थसंकल्प’ अशी टीका करत काही वेळा सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे आंदोलन करून सभात्याग केला.
देशद्रोह्यांच्या बाबतीत सरकार मौन : आर. अशोक
धरणे आंदोलनावेळी बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, सरकारने पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिलेल्यांना अटक केलेली आहे. देशद्रोह्यांच्या बाबतीत सरकार मौन आहे. कोणीही नैतिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाही. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. जनतेने आपल्याला निवडून आणले आहे. आम्ही जनहितार्थ काम केले पाहिजे. विधानसौधमध्ये देशविरोधी घोषणाबाजी होत असताना जनतेच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. विधानसौध दहशतवादाचे केंद्र बनत आहे, अशी परखड टीका केली.
सभाध्यक्षांकडून आंदोलन मागे घेण्याची विनंती
तेव्हा विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर यांनी सरकारने बुधवारीच या विषयावर उत्तर दिल्याचे सांगितले. आज देखील हा मुद्दा समोर ठेवून आंदोलन करणे योग्य नाही. अर्थसंकल्पावर मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायचे आहे. धरणे आंदोलन मागे घ्या, अशी विनंती केली. तरीही आर. अशोक यांनी सरकारवर टिकेची झोड उठविणे सुरूच ठेवले. घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केलेला नाही. देशद्रोह्यांचे रक्षण करण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.
7 जणांची चौकशी : डॉ. परमेश्वर
यावेळी सरकारच्यावतीने उत्तर देताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी प्रकरणाचा तपास सुरू आहे. 7 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. ऑडिओ, व्हिडिओतून सत्यता बाहेर येईल. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केलेले नाही. चुका करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. मात्र, या उत्तरावर समाधान न झाल्याने आर. अशोक यांनी सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुमच्यापेक्षा आमच्यात देशभक्ती अधिक आहे. पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हे नोंदवून चौकशी केली जात आहे. तपास प्रगतीपथावर आहे. आंदोलन मागे घ्या, असे सांगितले.
गदारोळातच मुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पावर उत्तर
परंतु, भाजप आणि निजदच्या आमदारांनी धरणे आंदोलन सुरू ठेवत सरकारविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. या गदारोळात मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावर उत्तर देण्यास प्रारंभ केला. त्यावेळी विरोधी आमदारांनी ‘काँग्रेसच्या गॅरंटी, देशद्रोह्यांची गॅरंटी’, ‘बोगस अर्थसंकल्प’ अशा घोषणा दिल्या. तसेच मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या गोंधळातही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पावर उत्तर देणे सुरूच ठेवले. नंतर सभाध्यक्षांनी कर्नाटक धनविनियोग विधेयक-2024-25 वर मते मागितली. त्यानंतर आवाजी मतदानाने ते संमत करण्यात आले. याच दरम्यान, भाजप आणि निजद आमदारांनी घोषणाबाजी करत सभात्याग केला. नंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलले.