भुयारी मार्गाविरुद्ध भाजपची जागरुकता मोहीम
बेंगळुरातील मार्गाला भाजप नेत्यांसह नागरिकांचा विरोध : योजना मागे घेण्याची मागणी
बेंगळूर : बेंगळुरातील भुयारी मार्गाला विरोध करत भाजपने रविवारी लालबागमध्ये जनजागृती मोहीम राबवली. विरोधी पक्षनेते आर. अशोक, खासदार तेजस्वी सूर्या, आमदार उदय गऊडाचार, सी. के. राममूर्ती, रवी सुब्रह्मण्य यांच्यासह अनेक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी या जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला. तसेच ही योजना मागे घेण्याची मागणी केली. या भुयारी मार्गाच्या निर्मितीमुळे लालबागला कोणताच फायदा होणार नाही. तसेच शहरातील वाहतूक कोंडीही कमी होणार नाही. भुयारी मार्गाचा सामान्य माणसाला कोणताही उपयोग होणार नाही. त्यामुळे भुयारी मार्ग योजना मागे घेण्याची मागणी भाजप नेत्यांनी केली. ‘बेंगळूर वाचवा, भुयारी मार्ग थांबवा’ या घोषणेखाली एका मोठ्या पॅनव्हासवर स्वाक्षरी करून भाजप नेत्यांसह जनतेने भुयारी मार्गाला विरोध व्यक्त केला.
ही कमिशन मिळविण्याची योजना : आर. अशोक
याप्रसंगी बोलताना विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले की, भुयारी मार्ग हा व्हीआयपी कॉरिडॉर बनेल. तेथे दुचाकींना परवानगी नाही. हा रस्ता काही व्हीआयपींसाठी बांधला जात आहे. ही कमिशन मिळविण्याची योजना आहे, अशी टीका त्यांनी केली. सदर भुयारी मार्ग निर्माण करण्याऐवजी राज्यातील काँग्रेस सरकारने जमिनीवरील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह वाहनांची सुरळीत वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलावीत, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला.
भाजपने योजनेवर टीका न करता सल्ला द्यावा : शिवकुमार
भाजप नेत्यांनी भुयारी मार्गाच्या योजनेवर टीका न करता सल्ला द्यावेत. ही योजना माझी मालमत्ता नसून तो जनतेसाठी केला जात आहे. भाजपने फक्त मला उपाय सांगावेत, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले. रविवारी सदाशिवनगर येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ भुयारी मार्गाच्या विरोधात भाजपच्या स्वाक्षरी संकलन मोहिमेबद्दल विचारले असता ते म्हणाले, मला स्वाक्षरी संकलन मोहिमेचे आवाहन कसे करायचे हे देखील माहित आहे. मी त्यांच्यापेक्षा जास्त संघटित करतो. ते एका संघटनेद्वारे संघटित होत आहेत. आम्ही पक्षाद्वारेच संघटित होत आहोत. कोणताही उपाय न देता टीका करण्याचा काय उपयोग? जर तुम्ही चांगल्या सूचना दिल्या तर त्या स्वीकारूया, असेही त्यांनी सांगितले.