For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपने सेमीफायनल जिंकली!

06:35 AM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
भाजपने सेमीफायनल जिंकली
Advertisement

पाच राज्यातील निवडणूका म्हणजे लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल असल्याचे म्हटले जात होते आणि ही सेमी फायनल नि:संशयपणे भाजपने मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड ही तीन राज्ये अपेक्षेपेक्षाही अधिक आत्मविश्वासाने जिंकून आपल्या नावावर केली आहेत. काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे तेलंगणामध्ये यश मिळवले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला यशाच्या घोड्यावर आरुढ होऊन भाजप येईल तो उत्तरेतील राज्यांमधून आणि काँग्रेस येईल तो दक्षिणेतील राज्यांमधून. या दरम्यानच्या प्रदेशात प्रादेशिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाची लढाई त्या त्या भागात कितपत टोकाची होते त्याच्यावरच देशाच्या ‘फायनल’चे चित्र अवलंबून असणार आहे. मात्र उत्तरेतील तीन राज्ये जिंकून भाजपने आपल्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला अधिक बळकट केले आहे. केंद्रीय नेतृत्वाचा एकछत्री अंमल आणि एकछत्री निर्णय, राज्याचे नेतृत्व करणाऱ्याचे नाव जाहीर न करता प्रत्येकाला संधी असल्याचे वातावरण करण्याचा लाभ भाजपला झाला आहे. तर काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाला निर्णयात झुकते माप देण्याच्या आणि टोकाचे मतभेद झाले तर प्रादेशिक नेतृत्वाचे ऐकण्याच्या भूमिकेला धक्का बसला आहे. अपयशाची माळ गळ्यात पडू द्यावी लागली आहे. मध्य प्रदेशातील यश भाजपच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचे यश मानावे लागत असले तरीही राजस्थानात अशोक गेहलोत यांची जादू संपवणे भाजपच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे होते. ती कामगिरी फत्ते करू देण्यात खुद्द गेहलोत यांचा हेकेखोरपणासुद्धा कारणीभूत ठरला आहे. भाजपच्या यशाचे सर्वात मोठे गमक हे त्यांच्या निवडणूक प्रचार तंत्रात आहे. ‘पॉलिटिकली करेक्ट’ असणे आजच्या काळात किती महत्त्वाचे आहे हे भाजप कृतीतून वारंवार दाखवून देत आला आहे. उदाहरणच द्यायचे तर मध्य प्रदेशात ज्या भागात एका दलित व्यक्तीच्या अंगावर मूत्रविसर्जन झाले होते त्या भागातील आमदाराला पुन्हा उमेदवारी न देता भाजपने तेथील खासदारांना विधानसभेला उतरवले आणि संपूर्ण देशाचे लक्ष लागलेला हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखला. राजकारणातील हे बारकावे भारतीय जनता पक्ष जितक्या शांतपणाने टिपतो आणि परिणामांचा गांभीर्याने विचार करतो तितका विचार देशातील अन्य पक्ष करत नसावेत. लोकांच्या मनावर होणारा परिणाम आणि त्यामुळे होणाऱ्या संभाव्य धोक्याला लक्षात घेऊन आपण जनतेच्या संतापाची दखल घेतली आहे हे दाखवणे आणि विरोधातील वातावरण जिथल्या तिथे संपवणे हे राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे असते. सत्तर वर्षे देशात सत्तेचेच राजकारण केलेल्या काँग्रेसमध्ये हे गुण दुर्मिळ झालेत हे प्रत्येक निवडणुकीत दिसत आहे. भाजपच्या या संपूर्ण निवडणुकीतील एक सर्वात महत्त्वाचे यश म्हणजे, त्यांनी कोणाही एका व्यक्तीला मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून लोकांसमोर ठेवले नाही. वास्तविक यापूर्वी एक चेहरा दाखवून भाजप निवडणूक लढवत होती आणि अध्यक्ष पद्धतीची ही निवडणूक लढवली जाते अशी त्यांच्यावर टीका होत होती. मात्र उत्तर भारतातील या राज्यांमध्ये एखाद्या व्यक्तीला पुढे करणे धोकादायक ठरू शकते हे जाणून त्यांनी खुद्द शिवराज सिंह चौहान यांचे नावसुद्धा उमेदवारांच्या यादीत शेवटच्या टप्प्यात जाहीर केले. त्यांच्याशिवाय अनेक नेते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत असे वातावरण निर्माण केले. तीच स्थिती राजस्थानमध्ये होती. वसुंधरा राजे यांच्या बरोबरीनेच इतर अनेक नावे त्यांनी चर्चेत ठेवली. छत्तीसगडमध्ये रमण सिंग या ज्येष्ठ नेत्याला नेतृत्व दिले तर इतर नाराज होतील हे लक्षात घेऊन चौधरी नावाचे एक प्रशासकीय अधिकाऱ्याचे नावसुद्धा चर्चेत ठेवण्यात आले. त्यामुळे ही निवडणूक एका व्यक्तीची आहे किंवा विजय झाला तर तोच मुख्यमंत्री होईल असे वातावरण न ठेवता आपल्यालाही संधी आहे असे वातावरण निर्माण करून भाजप नेतृत्वाने सत्तेच्या दावेदारांमध्ये चुरस लावली आणि त्यांना आपापल्या क्षेत्रात मोठे यश मिळवून आणण्याचे टार्गेट दिले. खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. हे एक तंत्र आहे आणि त्या तंत्रानुसारच लढले पाहिजे हे भाजप वारंवार दाखवून देत आले आहे. या उलट कमलनाथ आणि अशोक गेहलोत या नेत्यांनी मनमर्जी केली. संथ गतीने प्रचार केला. शिवराज सिंह चौहान यांनी दीडशेवर सभा केल्या याउलट कमलनाथ ढिम्मच होते. राजस्थानात गेहलोतनी पायलटना हेलिकॉप्टर दिले नाही. या तुच्छ राजकारणाचा पक्षाला फटका बसला. छत्तीसगडमधील लढाई अटीतटीची झाली असली तरी ती काँग्रेसला मोठी चपराक आहे. या छत्तीसगडच्या जोरावरच काँग्रेस आणि भाजपची लढाई दोन-दोन अशी बरोबरीची होईल असे काँग्रेस नेत्यांना वाटत होते. काँग्रेसला दिलासा असेल तो के चंद्रशेखर राव यांची सत्ता हिसकावून घेणाऱ्या तेलंगणात. राव यांचे राष्ट्रीय राजकारणात चमकण्याचे स्वप्न आता धुळीला मिळाले आहे. नांदेड आणि मराठवाड्याच्या पट्ट्यात घुसखोरी करून महाराष्ट्रात काँग्रेसला हतबल करण्याचे त्यांचे राजकारण आता चालणार नाही. भारत जोडो यात्रा राहुल गांधींना तेलंगणात देऊ केला शिवाय रेवंत रेड्डी सारखा एक युवा चेहराही मिळाला. ज्योतिरादित्य सिंदीया, सचिन पायलट यांना जवळपास गमावल्यानंतर त्यांची ही पहिली मोठी कमाई असेल. आता भारत जोडो यात्रेला हिंदी पट्ट्यात मोठे आव्हान आहे. तीन-चार महिन्यात झपाट्याने बदल करून अधिक बलाढ्या झालेल्या भाजपपुढे लोकसभेला आव्हान ठेवणे सोपे नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.