For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेट्रोल दरवाढीविरोधात भाजपचा खानापुरात आज रास्तारोको

10:29 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
पेट्रोल दरवाढीविरोधात भाजपचा खानापुरात आज रास्तारोको
Advertisement

खानापूर : कर्नाटक सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात खानापूर तालुका भाजपच्यावतीने गुरुवार दि. 20 रोजी सकाळी 10 वाजता शिवस्मारक येथील राजा छत्रपती चौकात रास्तारोको करण्यात येणार आहे. तसेच तहसीलदारांना दरवाढीच्या विरोधात निवेदनही देण्यात असल्याची माहिती भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तालुका भाजपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, जिल्हा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई, सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी, जनरल सेक्रेटरी बसवराज सानिकोप, सुरेश देसाई, संजय कंची उपस्थित होते.यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी म्हणाले, काँग्रेस सरकारने निवडणुका संपताच पेट्रोल आणि डिझेल दरवाढ केलेली आहे.

Advertisement

यामुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहेत. या दरवाढीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होणार असून सरकारने ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, या दरवाढीच्या निषेधार्थ खानापूर भाजपच्यावतीने गुरुवारी सकाळी रास्ता रोको करून तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे. यावेळी बोलताना जिल्हा सेक्रेटरी धनश्री सरदेसाई म्हणाल्या, राज्य सरकारकडे निधीच नसल्याने जाहीर केलेल्या योजना या कुचकामी ठरल्या असून विकासासाठी निधीच देण्यात येत नाही. महिलांना मोफत बसप्रवास योजना जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत.

त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. महिलांसाठी योजना जाहीर करताना विद्यार्थ्यांचे नियोजन होणे गरजेचे होते. यासाठी सरकारने विद्यार्थ्यांसाठी बसची सोय करणे गरजेचे आहे. संजय कुबल म्हणाले, शासनाच्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे संपूर्ण चक्रच बिघडलेले आहे. निवडणुका संपल्यानंतर सरकारने भरमसाट वाढ केल्याने सामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. यासाठी कर्नाटक सरकारने वाढवलेले दर तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी केली. तसेच गुरुवारच्या रास्तारोको आंदोलनात तालुक्यातील भाजपच्या, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.