भाजपतर्फे 9 रोजी सुवर्णविधानसौधला घेराव
बेळगाव : सोमवार दि. 8 पासून कर्नाटक सरकारच्या विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावात सुरू होणार आहे. मात्र, सदर अधिवेशन म्हणजे गोव्याला पिकनिकसाठी आल्यासारखे होऊ नये, लोकांच्या मनात अशा प्रकारची भावना निर्माण होऊ लागली आहे. सरकारने उत्तर कर्नाटकावर अन्याय न करता इकडची विकासकामे कशा पद्धतीने राबवता येतील, याकडे लक्ष देऊन काम करावे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात असल्याने सरकारला जाब विचारण्यासाठी भाजपकडून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 तारखेला भाजपचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली सुवर्ण विधानसौधला घेराव घातला जाणार आहे, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शुक्रवारी गांधीनगर येथील एका हॉटेलमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी सांगण्यात आले की, गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर कर्नाटकातील शेतकरी आंदोलन करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आवाज उठवत आहेत. पण सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. सरकारला शेतकऱ्यांची काळजी नसल्याचे आम्हाला दिसून येत आहे. शेतकऱ्यांची सरकारला चिंता नसून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. मुख्यमंत्री कोण होणार? गावरान कोंबडी आणि रस्सा हे सर्व टीव्हीवर पाहून चिकन व गावरान कोंबडीसाठी सरकार काम करत आहे का? अशा प्रकारची भावना निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांवरील अन्यायाविरोधात 9 तारखेला भाजपचे राज्याध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या सहकार्याने सुवर्ण विधानसौधला घेराव घालणार आहेत. त्यामुळे सर्वांनी येडियुराप्पा रोडवर सकाळी 10 वाजता जमावे. तेथून मोर्चाने जाऊन सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. विश्वनाथ पाटील, संजय पाटील, महांतेश कवटगीमठ, अॅड. एम. बी. जिरली यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.