For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपचा आज सुवर्ण विधानसौधला घेराव

12:30 PM Dec 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
भाजपचा आज सुवर्ण विधानसौधला घेराव
Advertisement

बी. वाय. विजयेंद्र : शेतकरी, बेरोजगारीवर सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी मंगळवार दि. 9 डिसेंबर रोजी भाजपने सुवर्ण विधानसौधला घेराव कार्यक्रम हाती घेतला आहे. ऊस, मका उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. सरकार त्या शेतकऱ्यांच्या मदतीला धावत नाही. सत्ताधाऱ्यांमध्ये केवळ खुर्चीसाठी संघर्ष सुरू झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केला.

सोमवारी सुवर्ण विधानसौध येथे पत्रकारांशी बोलताना बी. वाय. विजयेंद्र पुढे म्हणाले, भाजपच्यावतीने मंगळवारी शेतकऱ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. मेळाव्यानंतर सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यात येणार आहे. दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते, पक्षाचे आमदार यावेळी उपस्थित राहणार आहेत. सभागृहात उत्तर कर्नाटकातील समस्यांबरोबरच शेतकऱ्यांच्या समस्यांवरही प्रकाश टाकण्यात येणार आहे. सभागृहाबाहेरही आंदोलन छेडण्यात येणार आहे.

Advertisement

मुख्यमंत्रिपद वाचवण्याच्या घाईत सिद्धरामय्या आहेत तर मुख्यमंत्रिपद मिळवण्याच्या गडबडीत डी. के. शिवकुमार आहेत. विरोधी पक्षांकडून कोणताही प्रश्न विचारला गेला की केंद्राकडे बोट दाखवले जात आहे. सर्व काही केंद्रच करणार असेल तर मुख्यमंत्री कशासाठी हवा? सत्तेवर आल्यास सर्व समस्या सोडविण्याचे सांगून त्यांनी सत्ता काबीज केली आहे. बेरोजगारी, पाणीप्रश्न, विणकरांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या समस्यांवर कोणताच तोडगा निघाला नाही. आपण कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहोत, याचा सिद्धरामय्या यांना विसर पडला आहे. सारखे पंतप्रधानांना पत्र लिहितो, असे सांगत आहेत. त्यांना अद्दल घडविण्यासाठीच सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्यात येणार असल्याचे विजयेंद्र यांनी सांगितले.

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनीही सरकारवर टीका केली आहे. पत्रकारांशी बोलताना उत्तर कर्नाटकातील समस्या सोडविण्याकडे सरकारने साफ दुर्लक्ष केले आहे. याच मुद्द्यावर अधिवेशनात प्राधान्य दिले पाहिजे, यासाठी आपण सभापतींना पत्र पाठवले आहे. हे एक लुटारुंचे सरकार आहे. त्यांना अद्दल घडविण्यासाठी मंगळवारी भाजपने आंदोलन छेडले आहे. उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यावर गेल्या वर्षी पूर्ण प्रमाणात चर्चा झाली नाही. अचानक सभागृह तहकूब करण्यात आले. या अधिवेशनात तरी तसे होऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.