For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हनिट्रॅप प्रकरण संसदेत मांडण्यासाठी भाजपचा पुढाकार

11:09 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
हनिट्रॅप प्रकरण संसदेत मांडण्यासाठी भाजपचा पुढाकार
Advertisement

काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता : मुद्दा उपस्थित करण्यासाठी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी सूचना दिल्याची माहिती

Advertisement

बेंगळूर : कर्नाटक राज्याच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्या एका मंत्र्याच्या हनिट्रॅप प्रकरणाचा मुद्दा संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाची कोंडी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या एका प्रभावशाली मंत्र्यांविरोधात मंत्रिमंडळातील सहकारी हनिट्रॅप करण्याचा कट रचत असल्याचा आरोप कर्नाटकातच नाही तर दिल्लीतही झाला आहे. सध्या संसदेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू असून केंद्र सरकारच्या प्रत्येक मुद्यावर  विरोधात जाणाऱ्या विरोधी काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी हनिट्रॅपचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला आहे. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काही मंत्री आणि खासदारांना हे प्रकरण लोकसभा आणि राज्यसभेत मांडण्याची तोंडी सूचना दिल्याचे सांगितले जात आहे. केंद्रात कर्नाटकचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, खासदार तेजस्वी सूर्या, बसवराज बोम्माई, डॉ. के. सुधाकर यांच्यासह इतरांना हा मुद्दा उपस्थित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. आपल्याला हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहकार मंत्री के. एन. राजण्णांनी केला होता. मिळालेल्या संधीचा राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपने हनिट्रॅपच्या मुद्द्यात खोडा घातला आहे. विरोधकांविरोधात शक्मय तितकी मोट बांधण्याची तयारी केली आहे.

केंद्र सरकारच्या धोरणांवर कडाडून टीका करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना हे प्रकरण उकरून काढून कोंडीत पकडण्याचा भाजपचा डाव आहे. त्यामुळे सोमवारी कामकाज सुरू असताना कर्नाटकचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खासदारांनी उपस्थित रहावे, असे निर्देश जे. पी. नड्डा यांनी दिले आहेत. हे प्रकरण जितके जास्त खोदले जाईल, तितका काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर हादरा बसेल. मंत्रिमंडळातील सहकारी एखाद्या मंत्र्याविऊद्ध हनिट्रॅप करण्याचा विचार करत असल्याचे समोर आले तर काँग्रेस पक्षाचे मित्रपक्ष भविष्यात भारत आघाडीपासून दूर राहू शकतात. तसेच आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत त्या पक्षासोबत युती करण्यास मागे हटतील, अशी दूरदृष्टी आहे. माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांना हनिट्रॅपमध्ये अडकवलेल्या पथकानेच मंत्री राजण्णा यांच्यावरही दोनदा असाच प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, देवनहळ्ळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची वाहतूक करताना नुकतीच पकडलेली कर्नाटकचे डीजीपी रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी रान्या राव हिचे नाव हनिट्रॅपमध्ये उघड झाले आहे. आपल्या राजकीय प्रतिस्पर्ध्याला धक्का देण्यासाठी नेहमीच दुसऱ्याचा वापर करणाऱ्या प्रभावशाली नेत्याला धक्का पोहोचविण्यासाठी भाजपने तयारी केली आहे.

Advertisement

हनिट्रॅप प्रकरणाबाबत काँग्रेस हायकमांड संतप्त

राज्यात गाजत असलेल्या हनिट्रॅप प्रकरणाबाबत काँग्रेस हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाच्या चौकटीतच या विषयावर चर्चा न करता विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केल्याने हायकमांड संतप्त झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील तक्रार दाखल करण्यास उशीर झाला आहे. हनिट्रॅप प्रकरणामुळे पक्षाच्या वर्चस्वाला धक्का पोहोचल्याने हायकमांड नाराज झाले असून तक्रार दाखल करण्यापूर्वी हायकमांडशी चर्चा करून गुन्हा दाखल करण्याचे काम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. हनिट्रॅप प्रकरण विधानसभेत उपस्थित करण्याऐवजी पक्षाच्या चौकटीतच काँग्रेस हायकमांडशी चर्चा करता आली असती. याप्रकरणी सभागृहात चर्चा करणे योग्य नसल्याचे सांगण्यात आल्याने या प्रकरणातील तक्रार सादर करण्यास विलंब झाला आहे.

Advertisement
Tags :

.