मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप ठाम
‘म्हैसूर चलो’ची हाक : बेंगळूरमध्ये पदयात्रेला प्रारंभ : विरोधी पक्षातील नेत्यांकडून सरकारवर निशाणा
प्रतिनिधी/ बेंगळूर
म्हैसूर नगरविकास प्राधिकरणाच्या (मुडा) गैरव्यवहारावरून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी करत भाजप-निजदने पदयात्रा सुरू केली आहे. शनिवारी बेंगळूरच्या केंगेरी येथे ‘म्हैसूर चलो’ची हाक देत राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी पदयात्रेला चालना दिली. याद्वारे राज्य काँग्रेस सरकारमधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध रणशिंग फुंकण्यात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, प्रल्हाद जोशी, व्ही. सोमण्णा, शोभा करंदलाजे, माजी मुख्यमंत्री डी. व्ही. सदानंदगौडा, बसवराज बोम्माई, विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधानपरिषद विरोधी नेते चलवादी नारायणस्वामी, निजदच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष जी. टी. देवेगौडा, निजद युवा युनिटचे अध्यक्ष निखिल कुमारस्वामी, राज्य भाजप प्रभारी राधामोहनदास व भाजप-निजदचे आमदार, खासदार पदयात्रेत सहभागी झाले.
नगारा वाजवून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. तत्पूर्वी म्हैसूरमध्ये बी. वाय. विजयेंद्र यांनी चामुंडेश्वरी मंदिरात विशेष पूजा केली. तेथून ते थेट बेंगळूरच्या पदयात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले. एकूण 8 दिवस चालणाऱ्या पदयात्रेचा 10 ऑगस्ट रोजी म्हैसूरमध्ये समारोप होणार आहे. पदयात्रेच्या पहिल्या दिवशी शनिवारी 18 कि. मी. मार्गक्रमण करण्यात आले. रामनगर जिल्ह्यातील बिडदी येथे पोहोचल्यानंतर सायंकाळी पदयात्रेतील नेत्यांनी तेथेच वास्तव्य केले. मुडाच्या बेकायदा भूखंड वाटपप्रकरणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देईपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा भाजप-निजद नेत्यांनी दिला आहे.
शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी संघर्ष : विजयेंद्र
शोषित समुदायाला न्याय देण्यासाठी आम्ही संघर्ष सुरू केला आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले काँग्रेस पक्षाचे सरकार घोटाळ्यांचे सरकार बनले आहे, अशी परखड टीका भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी केली. पदयात्रा बिडदी येथे पोहोचल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. मुडाच्या भूखंडांसाठी अनेकजण प्रतीक्षेत आहेत. मात्र, सिद्धरामय्यांच्या कुटुंबाला 14 भूखंड मिळाले आहेत. शिवाय भूखंड त्यांच्या शिफारसीवरून देण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी विजयेंद्र यांनी केली. आम्ही गरीब, शोषित वर्गाला न्याय देण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे. दुसरीकडे सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार धमक्या देत आहेत. आम्ही धमक्यांना घाबरणार नाही. सिद्धरामय्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरुच राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेला सरकारच्या गैरव्यवहारांची माहिती देणार : कुमारस्वामी
आणखी 10 वर्षे आमचेच सरकार असेल, अशी फुशारकी मारणाऱ्या काँग्रेस नेत्यांना गर्व झाला आहे. किमान पुढील दहा महिने तरी सत्तेवर राहून दाखवा, असे आव्हान केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेस नेत्यांना दिले. म्हैसूर चलो पदयात्रेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलताना त्यांनी काँग्रेस नेत्यांवर शरसंधान साधले. तुमचे सरकार कोणीही अस्थिर करणार नाही. जनतेने दिलेली संधी तुम्ही गमावत आहात. एकामागोमाग एक गैरव्यवहार झाले आहेत. काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आम्ही संयुक्तपणे आंदोलन करत आहे. जनतेला सरकारच्या गैरव्यवहारांची माहिती देणार आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बिडदी येथे देवेगौडा कुटुंबाविषयी विचारलेल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देणार आहे, असेही कुमारस्वामी यांनी स्पष्ट केले.
सिद्धरामय्यांकडे पद सांभाळण्याची नैतिकता नाही : आर. अशोक
काँग्रेसच्या भ्रष्टाचारामुळे वाल्मिकी विकास निगमच्या अधिकाऱ्याने आत्महत्या केली. आता पीएसआयचा मृत्यू झाला आहे. सिद्धरामय्या यांना आता मुख्यमंत्रिपद सांभाळण्याची नैतिकता शिल्लक राहिलेली नाही. त्यांनी त्वरित राजीनामा देऊन घरी जावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी केली आहे. सिद्धरामय्या यांनी मुडाच्या 14 भूखंडांवर डल्ला मारला आहे. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी 300 भूखंड हडप केले आहेत. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच 3 ते 4 हजार कोटींची लूट झाल्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. शोषित वर्गाच्या जमिनी सिद्धरामय्यांनी मिळविल्या आहेत, असा आरोपही आर. अशोक यांनी केला.