भाजपने घालविला संचारबंदीचा काळ ः तावडे
भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी छोटा उदयपूर आणि पंचमहल जिल्हय़ातील जेतपूर पावी, हलोल, कालोल आणि गोध्रा मतदारसंघात प्रचारसभांना संबोधित केले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वाधिक काळ सत्तेवर राहिला आहे. स्वतःच्या कार्यकाळात काँग्रेसने आदिवासी समुदायाचा केवळ मतपेढी म्हणून वापर केला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आदिवासी समुदायाला समाज अन् विकासाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्यात आल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.
आदिवासी तरुण-तरुणी कौशल्य आणि आर्थिक दृष्टय़ा सशक्त होत आहेत. पहिल्यांदाच एका सामान्य आदिवासी कुटुंबातील महिला देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान झाली आहे. जागतिक नेत्यांना भेटल्यावर पंतप्रधान मोदी हे गुजरातच्या आदिवासी समुदायाकडून निर्मित चित्रे अन् हस्तकला उत्पादने भेटवस्तू म्हणून प्रदान करत असल्याचे तावडे यांनी म्हटले आहे.
1992 मध्ये राम मंदिर उभारणी आंदोलनातील अनेक करसवेकांचा त्याग अन् योगदानामुळेच आज राम मंदिर उभारणीचे कार्य पूर्ण होत आहे. त्या आंदोलनात सामील राहिलेले एक करसवेक आता कालोल येथील भाजप उमेदवार आहेत. त्यांचा विजय एक वेगळे महत्त्व दर्शविणारा ठरणार असल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.
काँग्रेसच्या मदतीने गोध्रा येथे झालेल्या निर्घृण हत्यांच्या जखमा आम्ही विसरलेलो नाही. भाजप सरकारने गोध्रामध्ये 680 कोटी रुपये खर्चुन वैद्यकीय महाविद्यालय अन् कौशल्य विद्यापीठ तयार करण्याचे काम केले आहे. काँग्रेसच्या शासनकाळात लोक संचारबंदीमुळे त्रस्त असायचे. तर भाजपच्या कार्यकाळात लोकांना संचारबंदीची कल्पना देखील नाही. नरेंद्र मोदींचे सरकार आल्यापासून गुजरात अन् देश दंगलमुक्त झाला आहे. आमचे सरकार दंगली घडविणाऱयांचा सन्मान करत नाही, तर त्यांना कठोर शिक्षा मिळवून देत असल्याचा दावा तावडे यांनी केला आहे.