भाजपतर्फे राज्य सरकारविरोधात निदर्शने
वाढत्या गुन्हेगारी विरोधात उठवला आवाज
बेळगाव : राज्यातील तुरुंगामध्ये दहशतवादी, गुन्हेगारांना शाही आदरातिथ्य देणाऱ्या काँग्रेस सरकार विरोधात बेळगाव जिल्हा भाजप ग्रामीण विभागाच्यावतीने बुधवारी निदर्शने करण्यात आली. जिल्हा पोलीसप्रमुखांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शने करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. प्रसार माध्यमांशी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील म्हणाले, राज्यातील कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. खून, अत्याचार, दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. गुन्हेगारीला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. गुन्हेगारांना पाठीशी घातले जात असल्यामुळेच गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गुन्हेगारांना तुरुंगामध्ये शाही व्यवस्था केली जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त करत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी केली. यावेळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष महांतेशगौडा, महादेव दरेण्णवर, श्रेयश नाकाडी, राजशेखर डोणी, डॉ. रवी पाटील, शिल्पा केकरे यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.