महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भाजप-राष्ट्रवादीसमोर लाडक्या नेत्यांना सांभाळण्याचे आव्हान

06:48 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महायुतीत भाजपने राष्ट्रवादीला सोबत घेतले, मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा झाला नाहीच. आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे अजित पवार गटाचे काही आमदार दादांची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत असताना, दुसरीकडे राज्यात नव्याने तयार झालेल्या भाजप राष्ट्रवादी महायुतीमुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांची भावी आमदारांची महायुतीतील राष्ट्रवादीमुळे गोची होत असल्याने या आमदारांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी सलगी वाढवली आहे.

Advertisement

.कोल्हापूरातील कागल विधानसभा मतदार संघात भाजपचे समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडल्यानंतर आता साताऱ्यात मदन भोसले हे देखील भाजपची साथ सोडून तुतारी फुंकण्याच्या तयारीत असून, शरद पवारांनी प. महाराष्ट्र या आपल्या बालेकिल्यात डाव टाकण्यास सुरूवात केली आहे. शरद पवारांच्या रडारवर भाजपचे इच्छुक आणि उत्सुक असलेले भावी आमदार आणि अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असल्याने, भाजप आणि अजित पवार यांच्यासमोर आता लाडक्या नेत्यांना सांभाळण्याचे आव्हान आहे.

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी सगळ्याच नेत्यांनी चाचपणी सुरू केली आहे. 2019 ला शांत बसलेल्या किंवा संयम बाळगून असलेल्या नेत्यांना आमदार होण्यासाठी 2024 हा पर्याय होता, त्यांना राज्यात नव्याने आकारास आलेल्या राष्ट्रवादी-भाजप महायुतीमुळे स्थानिक पातळीवर निर्माण झालेल्या राजकीय पेचामुळे ही संधी या वेळेलाही मिळणार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक भावी आमदारांनी नव्या राजकीय पर्यायाचा विचार केला असून, त्याची सुरूवात आता होऊ लागली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे राज्याच्या राजकारणातील वाढलेले महत्त्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा बघता काही नेत्यांनी शांत राहणे पसंत केले तर काही नेत्यांचे भाजपने विधानपरिषद उमेदवारी देऊन राजकीय पुनर्वसन केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीत जनतेचा नूर पलटताच गेली 5 वर्ष शांत असलेल्या प्रस्थापितांनी आता नव्या राजकीय पर्यायाचा विचार करण्यास सुरूवात केली आहे.

राज्यात भाजप-शिवसेना महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक घेण्यात आले. मात्र यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपच्या ज्या उमेदवारांची 2019 ला राष्ट्रवादीसोबत लढत झाली आणि त्यांचा पराभव झाला, त्या भाजपच्या उमेदवारांपुढे पर्याय कोणता एकतर उमेदवारी स्किप करणे किंवा भाजपची साथ सोडत नव्या राजकीय पर्यायाचा विचार करणे हा. असाच राजकीय पेच असणाऱ्या कोल्हापूरातील कागल विधानसभा मतदार संघातून समरजित घाटगे यांनी भाजपची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. घाटगेनंतर इंदापुरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे देखील वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करत असल्याची चर्चा असताना, तिकडे साताऱ्यात वाईमधून मदन भोसले हे देखील भाजपची साथ सोडून केव्हाही तुतारी हातात घेऊ शकतात. सोलापूरातील माढा आणि सोलापूर लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता माढा, पंढरपूर, माळशिरस विधानसभा मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलली असून, भाजप आमदार असलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील, भागीरथ भालके, प्रशांत परीचारक, बबनराव शिंदे हे नेते सध्या सावध पवित्रा घेताना दिसत आहेत. हे झाले भाजपमध्ये असलेल्या नेत्यांचे. आता अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांमध्ये देखील अस्वस्थता असून जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी रविवारी दुसऱ्यांदा शरद पवारांची भेट घेतली आहे.

शरद पवार यांनी ज्या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत, त्या ठिकाणी डाव टाकण्यास सुरूवात केली असून यामुळे अजित पवार गटातील अनेक आमदार घड्याळातील अचूक वेळ बघत कधी तुतारी हातात घेतील सांगता येत नाही. अजित पवार आणि भाजपच्या उमेदवारांचा 2019 ला ज्या विधानसभेत समोरासमोर सामना झाला, त्याठिकाणी आता भाजप आणि राष्ट्रवादीत जोरदार संघर्ष पहायला मिळत आहे. पुण्यातील मावळात राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनिल शेळके यांच्याविरोधात भाजपच्या बाळा भेगडे यांनी श•g ठोकला आहे. वडगाव शेरी येथे राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे आणि भाजपचे जगदिश मुळीक यांच्यात टोकाचा संघर्ष सुरू झाला असून आगामी काळात भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) गट यांच्यातील स्थानिक पातळीवरील संघर्ष वाढणार आहे. याचा मोठा फटका हा भाजपला आणि राष्ट्रवादीला बसणार आहे. दोन्ही पक्षांसमोर आपल्या लाडक्या नेत्यांना सांभाळण्याचे आव्हान असणार आहे.

अजित पवारांमुळे भाजपला तोटाच

अजित पवार त्यांचे आमदार घेऊन भाजपसोबत आले. भाजपने अजित पवारांच्या आमदारांचा मंत्रीमंडळात समावेश करताना, शिंदे गटाच्या मंत्र्यांची काही महत्त्वाची खाती अजित पवारांच्या मंत्र्यांना दिली. मात्र लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. सुनिल तटकरे हे रत्नागिरी-रायगड लोकसभा मतदार संघातून निवडून आले. तटकरे यांच्यासाठी भाजपात आलेले आणि लोकसभा निवडणुकीचा त्याग करणाऱ्या धैर्यशील पाटील यांना भाजपने नुकतीच राज्यसभेची उमेदवारी दिली तर दुसरी उमेदवारी ही राष्ट्रवादीचे साताऱ्यातील नितीन पाटील यांना भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासाठी त्याग केल्याने दिली. म्हणजेच भाजपच्या ज्या पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले यांच्या लोकसभेतील विजयामुळे रिक्त झालेल्या दोन जागांसाठी भाजपलाच त्याग करावा लागला म्हटले तर वावगे ठरणार नाही. fिशंदे गटाला भाजपसोबत गेल्यानंतर आत्तापर्यंत मिलिंद देवरा यांची एकच राज्यसभेची जागा मिळाली आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सुनिल तटकरे हे एकमेव खासदार निवडून आले तर प्रफुल्ल पटेल हे आधीपासून खासदार होते. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता वाईचे नितीन पाटील असे राष्ट्रवादीचे एकुण चार खासदार झाले असून भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार गटाने राज्यसभेच्या दोन जागा पदरात पाडून घेतल्या. एकुणच भाजपमुळे अजित पवारांचा फायदाच होत असून, अजित पवार मात्र भाजपसाठी अडचणीचे ठरत असल्याचे दिसत आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article