For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli Breaking : भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाला राम राम! विशाल पाटील यांना पाठिंबा

02:29 PM Apr 15, 2024 IST | Abhijeet Khandekar
sangli breaking   भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा पक्षाला राम राम  विशाल पाटील यांना पाठिंबा
MLA Vilasrao Jagtap
Advertisement

खा. संजयकाका व भाजपला मोठा धक्का

जत, प्रतिनिधी

सांगली लोकसभेसाठी सुरुवातीपासून संजय काकांना विरोध करणारे विलासराव जगताप यांनी आज थेट पक्षाचा राजीनामा देत काँग्रेसच्या विशाल पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे खा. संजयकाका आणि जिल्ह्यातील भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. जगताप यांच्यासह तालुका अध्यक्ष प्रमोद सावंत, युवा मोर्चाचे जिल्हा नेते संग्राम भैय्या जगताप, जत शहराध्यक्ष आण्णा भिसे, राजू डफळे, लक्ष्मण बोराडे, राजू चौगुले आदींनी आपले सामूहिक राजीनामे दिले आहेत.

Advertisement

दरम्यान, विलासराव जगताप यांनी निर्णय जाहिर केल्यानंतर दुष्काळी फोरम दोन दिवसात विशाल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय दिसेल असा ठाम दावा देखील केला असून, विशाल पाटील मोठया मताधिक्याने विजयी होतील असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी खा. संजय काका पाटील यांची राजकारणातील गद्दारी जाहीरपणे समर्थक कार्यकर्त्यांसमोर मांडली. जगताप यांच्या निर्णया नंतर मात्र सांगली लोकसभेसाठी आता चांगलीच चूरस वाढली आहे.

खासदार संजय काका व विलासराव जगताप यांच्यातील मतभेद गेल्या काही वर्षापासून टोकावर गेले होते. खासदार संजय काका यांनीच मागच्या विधानसभेच्या निवडणुकीत जगताप यांना अंतर्गत धक्का दिल्याचा आरोप जगताप गटाने त्यांच्यावर केला होता. त्यामुळे या दोघांमध्ये मतैक्य होण्याऐवजी ही दरी वाढतच गेली. त्याचे पडसाद आता लोकसभेच्या या निवडणुकीत दिसून येत आहेत.

Advertisement

सांगली लोकसभेसाठी संजय काका पाटील यांना भाजपने उमेदवारी देऊ नये अशी थेट मागणी माजी आमदार विलासराव जगताप यांनी केली होती. परंतु तरीही पक्षश्रेष्ठींनी तिसऱ्यांदा खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली आहे, तेव्हापासून जगताप हे पक्षावर नाराज होते. त्यामुळे जगताप कोणती भूमिका घेणार याकडे सबंध जिल्ह्याचे लक्ष लागले होते. अखेर सोमवारी जत मध्ये स्वाभिमानी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जगताप यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. या बैठकीला तालुक्यातून जगताप गटाचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यामुळे आता संजय काकांना जत मधून मताधिक्य घेताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
साहेब बांधतील ते तोरण...
जत तालुक्यात विलासराव जगताप यांचा आजही स्वयंभू असा गट आहे. जिकडे साहेब तिकडे आम्ही असे म्हणणारे कट्टर जगताप समर्थकांनी साहेब घेतील ते धोरण.. बांधतील ते तोरण म्हणत.. पाठिंबा दिला. शिवाय ज्या साहेबांनी पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदा कमळ फुलवले, त्याच साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जागा दाखवायची हीच वेळ असल्याचे कार्यकर्यांनी जाहिर केले.

Advertisement
Tags :

.