भाजप सदस्यता 1.07 लाख पार
आतापर्यंत सर्वाधिक सदस्य सांखळीत, नंतर वाळपईत
पणजी : राज्यात भाजपने हाती घेतलेल्या सदस्य नोंदणी मोहिमेस जनतेचा उदंड प्रतिसाद मिळत असून बुधवारी विशेष मोहिमेच्या दरम्यान 1.07 लाख एवढे सदस्य नोंद करण्यात आले, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. यापैकी सर्वाधिक सदस्य मुख्यमंत्र्यांच्या सांखळी मतदारसंघात तर त्याखालोखाल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या वाळपई मतदारसंघात नोंदविण्यात आले आहेत. दि. 1 सप्टेंबरपासून ही मोहीम प्रारंभ करण्यात आली होती. दि. 2 ऑक्टोबर गांधी जयंतीदिनी तिचा समारोप करण्यात येणार आहे. दरम्यानच्या काळात चतुर्थी उत्सव आल्यामुळे काही दिवस सदस्य नोंदणी थंडावली होती. गत बुधवारपासून तिला पुन्हा गती देण्यात आली व त्या एकाच दिवसात सुमारे 25 हजार सदस्यांची भर पडत आज एकूण संख्या 1.07 लाख पार झाली, असे तानावडे यांनी सांगितले. सरकारने आरंभलेल्या भाजप खासदार, मंत्री,आमदार यांचा कार्यकर्त्यांशी संवाद या उपक्रमा अंतर्गत तानावडे गुऊवारी भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी उपस्थित होते. त्या दरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी वरील माहिती दिली.
मंत्री राणे यांच्याशी चर्चा करणार
राज्यात नोकऱ्या उपलब्ध होत नसल्याच्या कारणावरून खुद्द मंत्री विश्जजित राणे यांनीच बुधवारी सरकारला घरचा अहेर दिला. त्यानंतर राज्यभरात चर्चेला उधाण आले. त्यासंदर्भात तानावडे यांना विचारले असता, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मात्र त्यासंबंधी आपण स्वत: मंत्री राणे यांच्याशी चर्चा करेन असे सांगितले.