जि. पं. साठी भाजप - मगोप युती
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : मगोला तीन जागा, काही अपक्षांना पाठिंबा
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप व मगोप यांची युती झाली असून मगोपला 3 मतदारसंघ देण्यात आले आहेत. काही ठिकाणी भाजप अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. उर्वरित मतदारसंघातील उमेदवारांची यादी मंगळवारी जाहीर होणार आहे. भाजपच्या नेत्यांची, प्रमुख पदाधिकाऱ्यांची जिल्हा पंचायत उमेदवारांसोबत काल सोमवारी पणजीतील भाजप कार्यालयात बैठक झाली. त्यानंतर वरील माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांना दिली. भाजपने यापूर्वी 19 मतदारसंघांतील उमेदवार जाहीर केले असून ते सर्व उमेदवार बैठकीस उपस्थित होते.
आज होणार बैठक
निवडणुकीचा प्रचार, रणनीती, पुढीच वाटचाल, अर्ज भरणे याबाबत उमेदवारांना मार्गदर्शन करण्यात आले. आज मंगळवारी पुन्हा भाजपची बैठक होणार असून त्यात इतर मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांबाबत चर्चा होऊन शेवटी उमेदवारांची घोषणा करण्यात येणार असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.
भाजपचा झेंडा फडकणार : नाईक
भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, मगो पक्षासोबत युती झाल्यात जमा असून मडकईतील दोन व मांद्रेची एक अशी एकूण तीन जागा मगो पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित 47 जागांवर सर्व ठिकाणी भाजप उमेदवार देणार नाही. काही मतदारसंघांत अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देणार आहे. बुधवारपर्यंत भाजपचे उमेदवार निश्चित होतील. दोन्ही जिल्हा पंचायतीवर भाजपचा विजय होऊन झेंडा फडकवणार असल्याची खात्री नाईक यांनी वर्तवली.
जिल्हा पंचायत मतदारसंघातील वस्तुस्थिती, पक्ष कार्यकर्ते आणि त्यांचे म्हणणे, सर्वेक्षण यांची दखल घेऊनच अंतिम उमेदवार निश्चित करण्याचे काम चालू आहे. निवडणुकीत भाजप-मगोप युती जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. बैठकीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, प्रमुख पदाधिकारी हजर होते.
काँग्रेसला भोगावी लागणार वाईट कर्मांची फळे
भाजपचे कार्य सातत्याने चालू आहे. त्याची उमेदवारांना प्रचारासाठी मदत होईल, असे नाईक यांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाने जी काही वाईट कर्मे केली आहेत त्याची फळे त्यांना आता भोगावी लागणार आहेत, असेही दामू नाईक म्हणाले.
-दामू नाईक
