तीन मुलांवर भाजप नेत्याचा गोळीबार
उत्तर प्रदेशमधील घटना : तिन्ही मुलांचा मृत्यू, पत्नी गंभीर
वृत्तसंस्था / सहारनपूर
उत्तर प्रदेशमधील सहारनपूर जिह्यातील गंगोह येथील संगाखेडा गावात एका भाजप नेत्याने आपल्या पत्नी आणि तीन मुलांवर गोळ्या झाडल्या. भाजप जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य योगेश रोहिला यांनी हे कृत्य केले असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. योगेश रोहिला यांनी केलेल्या गोळीबारात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान शिवांश (4), देवांश (7), श्रद्धा (8) या तिन्ही मुलांचा मृत्यू झाला. तर पत्नी नेहा (32) ही गंभीर जखमी झाली आहे.
भाजप नेत्याने घरातच हा गुन्हा केला. गोळीबाराचा आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील लोक घटनास्थळी पोहोचले असता चौघांच्याही डोक्यात गोळ्या झाडण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी भाजप नेत्याला अटक केली आहे. संशयित काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या ठीक नव्हता, असे प्राथमिक चौकशीत समजते. तसेच त्याच्याकडे परवानाधारक पिस्तूल असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
