भाजप-जनता दलाचा ‘चलो म्हैसूर’चा नारा
राज्य सरकारच्या भ्रष्टाचारविरोधात मोहीम
बेळगाव : भाजप व जनता दल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चलो म्हैसूर’चा नारा देण्यात आला आहे. राज्य सरकार भ्रष्टाचारात बरबटले आहे. सर्वत्र घोटाळे सुरू असून याविरोधात चलो म्हैसूरचा नारा देण्यात आला असून या आंदोलनामध्ये बेळगावमधीलही शेकडो भाजप कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती माजी आमदार संजय पाटील यांनी दिली. 3 ऑगस्ट रोजी बेंगळूर येथून ही पदयात्रा सुरू होणार असून 10 ऑगस्टला म्हैसूरला पोहोचणार आहे. राज्यात काँग्रेस सरकार अनेक घोटाळे करून सर्वसामान्यांची लुबाडणूक केली जात आहे. मुडा, अनुसूचित जाती-जमाती महामंडळ तसेच इतर घोटाळ्यांमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या व त्यांचे मंत्री गुंतले आहेत. याविरोधात भाजप आक्रमक भूमिका घेणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी माजी आमदार महांतेश दोड्डगौडर, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.